ठाणे : वागळे इस्टेट येथील राजीव गांधीनगर भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची त्याच्याच शाळेतील विद्यार्थ्यांने चाकू भोसकून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी १५ ते १६ वयोगटातील चार जणांना ताब्यात घेतले आहे.

हत्या झालेला विद्यार्थी राजीव गांधीनगर भागात असणाऱ्या शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत होता. तर मुख्य आरोपीही याच शाळेत शिकतो. सोमवारी मुख्य आरोपीच्या डोक्यात दुसऱ्या एका विद्यार्थ्यांने टपली मारली. या कारणावरून दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, त्यानंतर विद्यार्थी घरी निघून गेले. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानाबाहेरील प्रवेशद्वाराजवळ जमले. दरम्यान, टपली मारण्याच्या कारणावरून दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. आरोपीने त्याच्या शाळेबाहेरील दोन मित्रांना बोलावले होते. तर त्याचा आठवीत शिकणारा भाऊही या ठिकाणी होता. दरम्यान, हा वाद सोडविण्यासाठी तेथे जवळच उभा असलेला  विद्यार्थी गेला असता आरोपीने हातातील चाकू त्याच्या छातीत भोसकला. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सर्व विद्यार्थी पळून गेले.

घटनेची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी अंबिकानगर परिसरातून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे, असे ठाणे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.