Eknath Shinde ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे सध्या सुरु आहेत. यातील मेट्रो चार प्रकल्प (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) मार्गिकेच्या निर्माणाची कामे ठाणे शहरात सुरु आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सोमवारी या मेट्रोच्या चाचणीचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि लगतच्या शहरांसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा असल्यामुळे या चाचणीच्या निमीत्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह शिंदे शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केल्याचीही चर्चा आहे. असे असले तरी या महत्वाच्या मेट्रो मार्गाच्या चाचणीसाठी घोडबंदरच्या गायमुख पट्टयात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित रहाणार आहेत असे सांगितले जाते. हा प्रकल्प एकनाथ शिंदे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जात असला तरी या महत्वाच्या टप्प्यावर फडणवीस यांनी उपस्थित रहावे असे स्थानिक भाजप नेत्यांचाही आग्रह आहे.

ठाणे शहरात नागरिकरण वाढल्याने मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा ताण मध्य रेल्वे, शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर बसत आहे. त्यामुळे ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरु आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर एमएमआरडीएकडून हालचालींना वेग आला.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो मार्गिकेवर कोच उभारणीची कामे सुरु झाली. काही दिवसांपूर्वीच मेट्रो मार्गिकेवर मेट्रो ट्रेन सज्ज देखील झाली. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्यांची नजर मेट्रोच्या ट्रेनवर गेल्यास मेट्रो लवकरच धावणार अशी स्वप्न निर्माण होऊ लागली. तर काहीजण हा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणूकांसाठी सुरु असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, सोमवारी म्हणजे उद्या या मेट्रोची चाचणी होत आहे. यानिमीत्ताने राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या आणि विशेषत: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोटात कमालिचा उत्साह आहे. मेट्रो मार्गिकेचा बराचसा भाग हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात मोडतो. घोडबंदरच्या रहिवाशांना या प्रकल्पाची आस आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक उद्या होणाऱ्या चाचणीसाठी सर्व तयारीने सज्ज झाल्याचे सांगितले जाते.

फडणवीसांचे बारीक लक्ष

ठाणे मेट्रो प्रकल्पाची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. या प्रकल्पाची पायाभरणी सोहळाही त्यांच्याच काळात झाला होता. पुढे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. ठाणे मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री पद होते. तसेच ठाण्याचे पालकमंत्रीही तेच होते. त्यावेळी ठाण्यात आलेले देवेंद्र फडणवीस यांना शिंदे, तेव्हाचे आमदार प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांनी मेट्रोची प्रतिकृती भेट दिली होती. उद्या होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या चाचणीसाठी त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात यावे अशी स्थानिक नेत्यांची आग्रही मागणी होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस स्वत: या प्रकल्पातील चाचणीसाठी गायमुख भागात उपस्थित रहाणार आहेत अशे समजते. गायमुख ते कॅडबरी जंक्शन स्थानकापर्यत ही मेट्रो धावेल तेव्हा शिंदे यांच्यासोबत फडणवीसही उपस्थित असतील अशी माहिती सुत्रांनी दिली. यासंबंधीच्या वृत्ताला एमएमआरडीएकडून अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही.

कारशेड अद्याप नाहीच

मेट्रो मार्गिका तयार झाली असली तरी ठाण्यात निर्माण होणाऱ्या कारशेडचे काम अद्यापही झाले नाही. या कारशेडसाठी किमान वर्ष लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.