ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून या घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. रुग्ण नातेवाईकांनी केलेल्या तक्रारी स्वतः समितीपुढे मांडणार असून जेणेकरून सर्वच बाजूने चौकशी करून समितीला निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेचे धनी ठरले आहे. दरम्यान, मृत पावलेले काही रुग्ण वयोवृद्ध होते तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयातून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा – “…तर एव्हाना त्या डीनचं कानशिल लाल केलं असतं”, कळवा रुग्णालयातील प्रकारावर जितेंद्र आव्हाड संतापले!

हेही वाचा – ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्री १६ जणांचा मृत्यू, डीनची पहिली प्रतिक्रिया, मृत्यूचं कारणही सांगितलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. त्यात आरोग्य संचालक, महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, जेजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही समितीत घेण्यात येईल. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर आधीच्या रुग्णालयात नेमके काय उपचार झाले आणि इथे आल्यानंतर ते कोणत्या परिस्थितीत होते. इथे त्यांच्यावर काय उपचार झाले, अशी सविस्तर चौकशी करण्यात येईल. शिवाय रुग्ण नातेवाईकांनी केलेल्या तक्रारी स्वतः समितीपुढे मांडणार असून जेणेकरून सर्वच बाजूने चौकशी करून समितीला निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.