लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण- गेल्या चार वर्षापासून कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील ११ गाव हद्दीतील १०० हून अधिक रस्ते बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवडाभरात या विषयावर महसूल विभागाकडून निर्णय होऊन हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास या लढ्यासाठी गेल्या चार वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करणारे काटई येथील शिळफाटा रस्ते बाधित शेतकरी संघर्ष समितीचे गजानन पाटील यांनी सांगितले.
शिळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे तिसगाव, सोनारपाडा, सागाव, मानपाडा, काटई, निळजे, खिडकाळी, घारिवली, माणगाव, गोळवली, कोन भागातील रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम रस्ते बाधित शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. अनेक वर्ष आमच्या जमिनी शासनाने आम्हाला मोबदला न देता घेतल्या. यावेळी शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. तोपर्यंत रखडलेले काम पूर्ण करून दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांनी घेतली होती.
आणखी वाचा-मुंब्रा बाह्यवळणावरील भूस्खलन रोखण्यासाठी लवकरच सुरक्षा उपाययोजना
आतापर्यंत रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबादला देण्याच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी शासनाने दोन समित्या स्थापन केल्या. पहिल्या समितीचे कामकाजच झाले नाही. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठूी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने शेतकरी, भूमि अभिलेख, स्थानिक महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून एक सविस्तर अहवाल तयार केला. हा अहवाल काही महिन्यापूर्वी शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. या अहवालात बाधित शेतकरी भरपाईला पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिळफाटा रस्ता कल्याण ग्रामीण मतदार संघातून जातो. या मतदार संघाचे नेतृत्व मनसेचे आ. प्रमोद पाटील करत आहेत. आ. पाटील यांनीही शासनाने बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या विषयावर आवाज उठविला. ही मागणी मान्य करण्यात आली तर त्याचे श्रेय आ. पाटील यांना मिळेल . या विचाराने एका वजनदार लोकप्रतिनिधीने दोन वर्षाच्या काळात हा विषय अधांतरी राहील यादृष्टीने प्रयत्न केले. त्याचे चटके रस्ता रूंदीकरण नसल्याने शिळफाटा रस्त्यावरील प्रवाशांना, भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बसले. राजकीय चढाओढीत हा विषय रखडल्याचे शेतकरी खासगीत मान्य करतात.
आणखी वाचा-मीरा भाईंदर शहरात १८३ बांधकामे अनधिकृत, प्रशासनाकडून पहिल्यांदाच यादी प्रसिद्ध
खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा सोमवारी शिळफाटा परिसरात विकास प्रकल्प पाहणी दौरा होता. यावेळी शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱी समितीचे काटईचे गजानन पाटील आणि इतर शेतकऱ्यांनी खासदारांना निवेदन दिले. हा विषय लवकर मार्गी लागेल या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी केली. खा. डाॅ. शिंदे यांनी महसूल अधिकाऱ्यांंना संपर्क करून रस्ते बाधित शेतकऱ्यांचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आणि रखडलेल्या रस्ते कामाचा मार्ग मोकळा करण्याचे आदेश महसूल, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. या भरपाईसाठी गेल्या वर्षी बाधित शेतकरी ५२ दिवस शिळफाटा रस्त्यावर साखळी उपोषणाला बसले होते.