कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांच्या भागात नवीन इमारत उभारणीची कामे सुरू आहेत. या कामांसाठी लागणारे लोखंड, खडी, वाळू वर्दळीच्या रस्त्यावर आणून टाकले जात असल्याने शहराच्या विविध भागातील पदपथ बंद झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर हे साहित्य रस्त्यावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
विकासकांनी बांधकाम करताना पालिकेचे पदपथ, रस्ते अडवून ठेऊ नयेत. अशाप्रकारे पदपथ, रस्ते अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पालिकेचे नियम आहेत. तरीही काही विकासक अधिकाऱ्यांना न जुमानता राजकीय, वरिष्ठ स्तरावरून दबाव आणून कारवाईत अडथळा आणत असल्याच्या पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत.
नागरिकांच्या तक्रारी आल्या की अशा बांधकामांच्या ठिकाणी जाऊन तेथील रस्ते, पदपथ अडवून टाकलेले सामान बाजुला करण्यास सांगितले की तात्काळ वरिष्ठ स्तरावरून किंवा काही राजकीय व्यक्तिंचा दबाव विकासकांकडून आणला जात आहे. त्यामुळे कारवाईत अडथळा येतो, असे स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बांधकामांच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत अवजड मालवाहू वाहने येऊन उभी राहतात. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होतो. अनेक ठिकाणी बांधकामांच्या ठिकाणी जेसीबी, पोकलने आणून उभे केले जातात. ही वाहने वाहतुकीला अडथळा येतात. अनेक ठिकाणी मागील महिन्यापासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याचे चित्र कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात आहे. त्यामुळे वाहन वळविताना चालकांना कसरत करावी लागते. काँक्रिटीकरणामुळे गटार, पदपथ उंच झाले आहेत. अनेक नागरिक या पदपथावर पाय घसरून पडू या भीतीने रस्त्याच्या कडेने चालतात. काही ठिकाणी पदपथ बांधकाम साहित्यांनी वेढलेले असताना रस्त्यावर खडी, लोखंडी, बांधकामाची सामग्री टाकून रस्ता अडवून ठेवला जात आहे.
पाऊस सुरू असल्याने या अडगळीमुळे नागरिकांना त्या भागातून चालणे अवघड होते. शहराच्या अनेक भागात काँक्रीट रस्ते कामे, या ठिकाणची गटारांची कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांमुळे रस्ते वाहतुकीत अडथळा येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या रस्त्यांवरून शाळेच्या बस धावतात. बस चालकांना कसरत करत या रस्त्यांवरून बस न्याव्या लागतात. काही ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणच्या लोखंडी गज वाकविण्यासाठी परिसरातील झाडांचा वापर केला जात होता. हा प्रकार जागरूक नागरिकांनी उघडकीला आणल्यावर पालिकेने त्या भागातील लोखंडी सळया वाकविण्याच्या झाडाला लावलेल्या कैच्या तोडून टाकल्या होत्या.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ठाणे जिल्ह्यातील काही महापालिका अव्वल स्थान प्राप्त करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेला यामध्ये स्थान मिळाले नसल्याने पालिकेने सार्वजनिक स्वच्छतेबरोबर बांधकामांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अडगळ आणि घाणीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. शहरातील काँक्रीट रस्ते, स्वच्छता, फेरीवाले, फवारणी पाहणीसाठी पालिका वरिष्ठांनी दिवसभराचे सततचे बैठकांचे सत्र कमी करून स्वतासह समपदस्थ अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.