मुख्य अभियंत्यांची अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे : ठाणे शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढू लागल्याने त्याचा फटका उद्योग-व्यवसाय, घरातून काम करणारा नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना बसू लागला असून या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा वीजपुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्याच्या सूचना महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

करोना टाळेबंदी आणि सततच्या र्निबधांमुळे व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रवासबंदीमुळे अनेकांना घरातूनच काम करावे लागत आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरातून ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढू लागले असून त्याचा फटका उद्योग-व्यवसाय, घरातून काम करणारा नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे ठाणेकरांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत लोकसत्ता ठाणे या सहदैनिकात नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यापुढेही ग्राहकाचा वीजपुरवठा विनाव्यत्यय राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी संबंधितांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्थेने पूर्ववत करणे किंवा बाधित वाहिनी  पूर्ववत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी ममता पाण्डेय यांनी दिली.

ठाणे शहरात अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे वाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाला होता. काही ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे, रोहित्रामध्ये बिघाड झाल्यामुळे, उपकेंद्रामध्ये बिघाड झाल्यामुळे तसेच काही ठिकाणी वीजवाहक तार तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. ज्या ठिकाणी शक्य होते, त्या ठिकाणी पर्यायी वाहिनीवरून वीजपुरवठा सुरळीत करण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला, असेही पाण्डेय यांनी सांगितले.