बदलापूरः बदलापूर आणि वांगणीदरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे रूळाला तडा दिल्याने सकाळच्या सुमारास अर्धा तास वाहतूक ठप्प होती. त्यानंतर तातडीने उपाययोजना केल्याने सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या आणि कर्जतहून मुंबईसाठी सुटणाऱ्या लोकल गाड्यांवर परिणाम झाला. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बदलापूर ते वांगणी या दरम्यान रेल्वे रूळावर तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बदलापूरहून सुटणारी ८ वाजून ११ मिनिटांची लोकल पुढे जाऊन खोळंबली. याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने रूळ दुरूस्तीचे काम सुरू केले. अर्धा ते पाऊण तासात रूळ दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर खोळंबलेली कर्जत लोकल वांगणीकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांना त्याचा फटका बसला. त्याचवेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला.
कर्जत लोकल कर्जत स्थानकात उशिराने पोहोचल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वेळपत्रकावर त्याचा परिणाम झाला. तसेच कर्जतहून येणाऱ्या लोकल गाड्यांना उशिर होत असल्याने त्या लोकलच्या प्रवाशांनी बदलापूर, अंबरनाथहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
लोकल गाड्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उशिराने धावतात. त्यात आजच्या या खोळंब्यामुळे लोकल गाड्या अधिक उशिराने चालल्या. त्याचा लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम जाणवला.