अंबरनाथः श्रावण महिन्यातल्या पहिल्याच सोमवारी ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा अंबरनाथच्या शिवमंदिरात भाविकांनी हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली. सकाळपासूनच मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. मात्र भर पावसात भाविकांना कोणत्याही सुविधांशिवाय दर्शन घ्यावे लागले. भाविकांसाठी छप्पर तर नव्हतेच पण येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची तात्पुरती सुविधाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

राज्यातील शिलाहारकालीन मंदिरांपैकी एक सुस्थितीत अससलेले ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात एक शिवमंदिर आहे. राज्यभरातून अनेक पर्यटक, इतिहास आणि पुरातत्व अभ्यासक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. स्थानिक आणि शिव भक्तांसाठी हे मंदिर पूजनीय आहे. महाशिवरात्री, तसेच श्रावण महिन्यात येथे मोठा उत्सव होत असतो. सोबतच येथे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलही भरवला जातो. त्यानिमित्ताने लाखो नागरिक येथे हजेरी लावतात. गेल्या काही वर्षात या मंदिराची महती मोठी पसरली आहे. त्यामुळे दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अंबरनाथच्या या शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या. मंदिरातील ही रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनी रस्त्यापर्यंत गेली होती. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सोमवारी दर्शनासाठी रांगेत उभे होते. मात्र येथे भाविकांच्या सुविधांबाबत मोठी उदासिनता दिसून आली. भाविकांसाठी दर्शन रांगेत कोणतेही छप्पर नव्हते. त्यामुळे भाविकांना पावसात भिजतच रांगेत उभे राहावे लागले.

सोबतच येथे पिण्याच्या पाण्याची, तसेच तात्पुरत्या स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा नव्हती. मंदिराच्या जवळ गेल्यानंतर चप्पला ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे भाविकांना रस्त्यावरच चप्पला, जोडे काढून दर्शनासाठी जावे लागत होते. त्यामुळे भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

दोन पालिकांच्या वेशीवर असलेले हे मंदिर भाविकांसाठी महत्वाचे आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत हे मंदिर येत असले तरी उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीपर्यंत भाविकांच्या दर्शन रांगा जात असतात. मात्र दोन्ही पालिकांकडून भाविकांच्या सुविधांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाशिवरात्रीच्या वेळी काही सुविधा दिल्या जातात. मात्र श्रावणी सोमवारी तरी या सुविधा असाव्यात अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत होती. याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना विचारले असता, भाविकांची गैरसोय होणे योग्य नाही. याबाबत तातडीने अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन योग्य त्या सुविधा पुरवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.