कल्याण: कल्याण येथील पश्चिमेतील भानुसागर सिनेमा जवळील रुचिरा बार आणि रेस्टाॅरंच्या मालकाच्या मुलाने शहापूर येथील एका ग्राहकाला हाॅकीने बेदम मारहाण केली. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. जुम्मु शेख (५३, रा. शहापूर) असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. ते शहापूर भागात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. जुम्मु यांनी रुचिरा हाॅटेलचे मालक अशोक शेट्टी यांच्या मुलगा विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार जुम्मु शेख मंगळवारी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आले होते. दुपारच्या वेळेत ते रुचिरा बार ॲन्ड रेस्टाॅरन्टमध्ये भोजन करण्यासाठी गेले. त्यांनी तेथे मद्य घेतले. खानपान झाल्यानंतर ते हाॅटेलच्या रोखपाल मंचासमोर आले. त्यावेळी हाॅटेल चालकाने त्यांना जेवणाचे देयक दिले. तेवढे पैसे जुम्मु यांच्या जवळ नव्हते. हाॅटेल मालक अशोक शेट्टी यांचा मुलगा देयक घेण्याचे काम करत होता. देयकाची पूर्ण रक्कम जवळ नाही, ती ऑनलाईन मागवुन घेतो आणि तात्काळ देतो असे जुम्मु यांनी सांगितले.
हेही वाचा >>> कल्याण जवळील मोहने येथे तरुणीचा डेंग्युने मृत्यू
थोडा वेळ मागितल्याचा राग हाॅटेल चालकाला आला. त्याने जुम्मु यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तेथे त्यांना हाॅकीने बेदम मारहाण केली. जुम्मु यांना गंभीर दुखापत झाली आहे. हाॅटेलमधून बाहेर पडल्यावर जुम्मु यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले या प्रकरणाचा तपास करत आहेत.