डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीतील विक्रांत पॅलेस आणि स्वीट डीम्स बारवर पोलीस उपायुक्तांच्या अवैध धंदे कारवाई पथकाने छापा टाकून ३० जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत १४ महिला गायिका, ११ पुरूष ग्राहक, बार मालक, रोखपाल आणि वाद्यवृंद वादक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीतील विक्रांत पॅलेस स्वीट ड्रीम्स बारमध्ये महिला तोकडे कपडे घालून अंगविक्षेप करून गाण्यांवर नाचत असतात. पुरूष ग्राहक त्यांच्यावर पैशांची उधळण करत असतात अशी गुप्त माहिती पोलीस उपायुक्तांच्या बेकायदा धंदे कारवाई पथकाला मिळाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून पथकाने टिळकनगर पोलिसांच्या मदतीने रात्री्च्या वेळेत विक्रांत पॅलेस आणि स्वीट ड्रीम्स बारवर छापा टाकला. त्यावेळी हिंदी गाणे चालू होते. १४ महिला गायिका गाणे गात होत्या. काही महिला गायक पुरूष ग्राहकांच्या जवळ उभे राहून अंगविक्षेप करत असल्याचे आणि त्या तोकड्या कपड्यांमध्ये असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांचा छापा पडताच काही ग्राहक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना पोलिसांनी रोखून धरले. पोलिसांनी महिला गायकांची माहिती घेतली. बहुतांशी महिला गायिका या नवी मुंबईतील कोपरखैरणे, घणसोली, ठाणे, कल्याण, उल्हासनगर भागातून आल्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ११ ग्राहक हे शहापूर, वासिंद, आजदे गाव, डोंबिवली, ठाणे परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी बारचे मूळ मालक विक्रांत जनार्दन पाटील, बारचे व्यवस्थापक, महिला गायिका, रोखपाल, पुरूष सेवक, वाद्यवृंद वादक यांच्यासह एकूण ३० जणांवर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ५४,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हवालदार अमित शिंदे याप्रकरणात तक्रारदार आहेत.
शिळफाटा रस्त्यालगतचे आणि कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या वाढत्या तक्रारी पोलिसांकडे येत असल्याने पोलिसांच्या बेकायदा धंदे पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्या बार चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याला कोणतीही पूर्वसूचना न देता उपायुक्तांचे विशेष पथक ही कारवाई करत आहे. या कारवाईमुळे बार परिसरात राहत असलेले रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. पोलिसांनी हे छापासत्र वाढवावे अशी नागरिकांची मागणी आहे.