कल्याण-डोंबिवली परिसरातील तलावांची देखभाल तसेच निगा व्यवस्थित राखली जात नसल्याचे ढळढळीत उदाहरण पुन्हा एकदा पुढे आले असून गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मिलापनगर परिसरातील तलावांमधील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे.
डोंबिवली औद्योगिक विभागातील मिलापनगर तलावात मूर्ती विसर्जित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सातत्याने पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. असे असताना प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होत असल्याचा आरोप डोंबिवली वेल्फेअर रहिवासी संघाचे राजू नलावडे यांनी केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील औद्योगिक विभागातील मिलापनगर येथील छोटय़ा तलावात सोमवारी सकाळी मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. एक ते दीड फूट लांबीचा व्हाइट शार्क, मंगोर या जातीचे हे मासे असून ते अचानक कसे मेले याविषयी परिसरात चर्चा सुरू झाली.
या तलावात गेल्या वर्षी मासे तसेच कासव मृत्युमुखी पडले होते. १५ फुटांच्या आसपास खोली असणाऱ्या या तलावात अनेक जलचर प्राणी विहार करतात.
परंतु गणेशोत्सव, माघी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात येथे घरगुती तसेच सार्वजनिक मूर्तीचे मोठय़ा प्रमाणात विसर्जन करण्यात येते. या मूर्तीनी हा तलाव भरत असल्याने या वर्षी कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठय़ा मूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी घातली होती. असे असतानाही काही मंडळांनी येथे मोठय़ा मूर्तीचे विसर्जन केले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि मूर्तीवरील रंगकामामुळे पाणी रसायनमिश्रित झाले. यामुळेच हे मासे मेले असावेत. हे असेच चालू राहिले तर या तलावाचे अस्तित्वही लवकरच लोप पावेल. यासाठी येथील रहिवासी मिळून तलाव बचाव कृती समिती स्थापन करीत असल्याचे राजू नलावडे यांनी सांगितले.