कल्याण – कल्याण, डोंबिवली ते दिवा, मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे मार्गात दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे समोरचे दिसण्यास अडथळा येत असल्याने लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या संथगतीने चालविल्या जात आहेत. मोटारमन भोंगा वाजवत दर्शनी भागातील प्रखर झोत दिवे लावून लोकल चालवित आहेत.
दाट धुक्यामुळे दहा फुटाच्या पलीकडचे दिसत नसल्याने लोकलचे मोटारमन, एक्सप्रेसचे लोको पायलट गाड्या धुक्याची चादर असलेल्या भागातून संथगतीने चालवित आहेत. समोरून येणाऱ्या लोकल, मेल, एक्सप्रेस, रेल्वे मार्गात असलेल्या वस्ती लगतच्या नागरिकांना इशारा देण्यासाठी मोटारमन भोंगे वाजवून त्या भागातून लोकल, एक्सप्रेस पुढे नेत आहेत.
एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी धुकेही पडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मंगळवारी रात्रीपासून धुके पडण्यास सुरूवात झाली होती. रात्री बारा वाजल्यानंतर धुक्याचा प्रभाव वाढला. धुक्याचे लोळ वाढू लागले. धुक्याची दाट चादर वातावरणात तयार झाली. दाट धुक्यामुळे पहाटे तीन ते चार वाजल्यापासून होणारी चिवचीव, कलकलाट बुधवारी थांबला होता.
बुधवारी सकाळी प्रवासी कल्याण, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा रेल्वे स्थानकात आले. तेव्हा त्यांना सर्वदूर रेल्वे मार्ग आणि परिसरात दाट धुके पडले असल्याचे दिसले. कल्याण ते ठाकुर्ली, डोंबिवली ते मुंब्रा पर्यंतचा रेल्वे मार्ग धुक्यान लपेटून गेला होता. धुक्यामुळे नियोजित वेळेत लोकल, एक्सप्रेस चालविणे शक्य होत नसल्याने धुक्याच्या दुलईमधून मोटारमन, एक्सप्रेसचे लोको पायलट समोरील रेल्वे मार्ग दिसेल त्या वेगात लोकल, एक्सप्रेस चालवित असल्याचे सकाळचे दृश्य होते. रेल्वे स्थानकात कसारा, कर्जत, टिटवाळा, आसनगाव, बदलापूर भागातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलही उशिराने धावत होत्या.
कसारा, कर्जत, आसनगाव, बदलापूर भागातही दाट धुके असल्याचे प्रवाशांनी सांगितले. आतापर्यंत तांत्रिक कारणामुळे उशिराने धावत असलेल्या लोकल बुधवारी सकाळी दाट धुक्यामुळे उशिराने धावत होत्या. लोकल रेल्वे स्थानकात येईपर्यंत त्या लोकलवरील दर्शनी भागातील नावाचा फलक दिसत नव्हता. धुक्यामुळे लोकलचे टप, रेल्वे फलाटांवर दवबिंदुंचे पुंजके जागोजागी दिसत होते. भुरभुर पाऊस पडल्यानंतर ओले होणाऱ्या रस्त्यांंप्रमाणे धुक्यामुुळे सर्वदूर ओलावा होता. लोकलच्या दरवाजात उभे राहून सकाळीच धुक्याचे लोट अंगावर घेण्याचा आनंद काही हौशी प्रवासी घेत होते. धुके म्हणजे पाऊस गेला आणि थंडी येणार अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.
मुंब्रा देवी डोंगरावर पहाटेच देवीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक दाट धुक्यामुळे मोबाईल मधील विजेऱ्या सुरू करून देवीच्या डोंगरावर पायी चढत होत होते, दूरवरून या विजेऱ्या काजव्यांसारख्या चमकत होत्या. सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान धुक्यातून सुर्याने दर्शन दिले आणि हळूहळू धुक्याचा प्रभाव कमी होत गेला.