भगवान मंडलिक
कल्याण- कल्याण पश्चिमेतील चिकणनगर मधील होली क्राॅस रुग्णालया समोरील सहदुय्यम निबंधक दोन कार्यालयातील वाद्ग्रस्त सहदुय्यम निबंधक गोरखनाथ सातदिवे यांची विभागीय चौकशी नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक विभागाने सुरू केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
पुणे येथील नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक विभागाच्या आस्थापना कार्यालयाकडून सातदिवे यांच्यावर कारवाई होईल. ही कारवाई खूप कठोर असेल, असे सुतोवाच वरिष्ठ सुत्राने केले. सातदिवे यांचे निलंबन अटळ असल्याची चर्चा नोंदणी कार्यालयांमध्ये आहे. चालू विधीमंडळ अधिवेशनात सहदुय्यम निबंधक सातदिवे यांनी केलेल्या बेकायदा दस्त नोंदणीचा विषय आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सहदुय्यम निबंधकावर कारवाई प्रस्तावित असल्याचे आश्वासन दिले आहे.नियमबाह्य दस्त नोंदणी केली म्हणून तीन महिन्यापूर्वी सातदिवे यांचा कल्याण कार्यालयातील पदभार काढून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. चंद्रपूर येथे शिक्षा म्हणून बदली करण्यात आली. तेथे ते हजर झाले नाहीत. सातदिवे यांच्याकडे आता कोणताही पदभार नाही.
हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामुळे ठाण्यात कोंडी
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) यापूर्वीच सातदिवे यांची चौकशी केली. ‘एसआयटी’ समोर नियमबाह्य दस्त नोंदणी केली नसल्याचा पवित्रा सातदिवेंनी घेतला. प्रत्यक्ष तपासणीत सातदिवे यांनी डोंबिवलीतील महारेरा प्रकरणातील काही इमारती, २७ गाव परिसरातील बेकायदा इमारतींची दस्त नोंदणी केल्याचे चौकशी पथकाच्या निदर्शनास आले.‘एसआयटी’ने डोंबिवलीतील महारेरा ६५ प्रकरणातील दस्त नोंदणी करू नये, असे लेखी आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाला गेल्या वर्षी दिले होते. सातदिवे यांना त्याची माहिती असुनही त्यांनी या प्रकरणातील बेकायदा इमारतींची दस्त नोंदणी केली. तपास पथकाने सातदिवे यांनी आदेशाचे उल्लंघन करणे, नियमबाह्य दस्त नोंदणी करणे, असे ठपके ठेवले आहेत.
सातदिवे चौकशीच्या फेऱ्यात
‘कल्याणमध्ये सहदुय्यम निबंधकांकडून नियमबाह्य दस्तनोंदणी’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रथम एप्रिलमध्ये प्रसिध्द केले होते. या वृत्ताची गंभीर दखल शासनाने घेतली. या वृत्तानंतर सातदिवे यांनी दस्त नोंदणी केलेल्या प्रकरणांची चौकशी नोंदणी विभागाने सुरू केली. नोंदणी विभागाच्या चौकशीत सातदिवे यांनी नियमबाह्य दस्त नोंदणी केल्याचे उघड झाले. तसा चौकशी अहवाल शासनाला पाठविला आहे, असे सुत्राने सांगितले.
हेही वाचा >>>कल्याणमधील शिवाजी चौकातील वाहतुकीत दोन दिवस बदल
कल्याणमध्ये असताना ७२ दस्त नोंदणी प्रकरणे सातदिवे यांनी पाचव्या शिक्क्यासाठी का रखडून ठेवली. याचीही चौकशी होण्याची मागणी दलालांकडून होत आहे. ‘एसआयटी’, नोंदणी विभागाचे अहवाल सहदुय्यम निबंधक सातदिवे यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेणारे असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असे सुत्राने सांगितले. सातदिवे यांनी यापूर्वी जेथे काम केले आहे. तेथील दस्तांची चौकशीची मागणी होत आहे.
कल्याण, डोंबिवलीत बेकायदा इमारतींमधील घरांची दस्त नोंदणी पूर्ण ठप्प असल्याने भूमाफियांमध्ये अस्वस्थता आहे. ही नोंदणी सुरू करण्याचा प्रयत्न माफियांकडून सुरू होता. ‘लोकसत्ता’ने ‘बेकायदा बांधकामांचे कल्याण’ वृत्त प्रसिध्द करताच माफियांचा तो प्रयत्नही हाणून पडला.