थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षाव

ठाणे : सातत्याने प्रयत्न करूनही थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयश येत असलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनाने आता कर वसुलीसाठी नवी शक्कल लढवली आहे. थकबाकीदारांनी कराचा एक रकमी भरणा करावा यासाठी केंद्र सरकारने चलनातून मागे घेतलेल्या दोन हजारांच्या नोटा अमर्यादपणे स्वीकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षावही केला आहे. या निर्णयामुळे ऑगस्ट अखेर महापालिका तिजोरीत अधिक कोटीचा भरणा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. थकीत कर भरण्यास असमर्थता दाखविणाऱ्या थकबकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पालिकेकडून गेल्यावर्षी करण्यात आली. या कारवाईनंतरही मालमत्ता कराची गेल्या वर्षाची थकबाकी ७०७ कोटी रुपये इतकी आहे. या कर वसुलीसाठी आता प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. कर भरण्यासाठी केंद्र सरकारने चलनातून मागे घेतलेल्या दोन हजारांच्या नोटा अमर्यादपणे भरण्याची मुभा प्रशासनाने थकबकीदारांना दिली आहे.

हेही वाचा >>>“ते भाजपा कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, मी स्वतः…”, शिंदे गटाबरोबरच्या वादावर भाजपा नेत्याची मोठी प्रतिक्रिया

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बँकेत केवळ १० नोटाच स्विकारल्या जातील, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याच संधीचा फायदा घेऊन भिवंडी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी थकीत कर भरण्यासाठी या नोटा अमर्यादपणे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, १५ जुन २०२३ पर्यंत संपूर्ण रक्कम भरल्यास ५ टक्के, १६ जुन ते ३० जुन २०२३ पर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास ४ टक्के, १ जुलै ते ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास ३ टक्के आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत संपूर्ण कराची रक्कम भरल्यास २ टक्के अशा चार टप्प्यांमध्ये करदात्यांना आणि थकबाकीदारांना कर सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती भिवंडी महापालिका मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>ठाण्यातील भीषण अपघातानंतर धावपटू डॉ. महेश बेडेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, धावपटूंसाठी सकाळी आणि रात्रीच्या वेळेत रस्ते आरक्षित करण्याची मागणी

उत्पन्नात भर पडेल

मालमत्ता कराची २०२३-२०२४ या चालू वर्षातील मागणी देयकांच्या छपाईचे काम सुरु असून लवकरच त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. भिवंडी महापालिकेने यापूर्वी जवळ-जवळ सात ते आठ वेळेस अभय योजना लागू केलेली होती. परंतू मालमत्ताधरकांकडून हवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याने मालमत्ता कराच्या थकबाकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन हजारांच्या नोटा भरण्याची मुभा आणि कर सवलत याचा फायदा थकबकीदारांनी घेतल्यास मालमत्ता जप्तीची कारवाईची डोकेदुखी थांबणार आहे. तसेच महापालिकेच्या ऊपन्नांतही अधिक प्रमाणांत भर पडेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

दोन हजारांच्या नोटा भरून थकबकीदारांना करमुक्त होता येणार आहे. त्याचबरोबर ठरवून दिलेल्या मुदतीत कर भरल्यास सवलत दिली जाणार आहे. थकीत कराचा भरणा झाल्यास महापालिका उत्पन्नात वाढ होईल. यामुळे कर भरणा करून थकबकीदारांना शहराच्या विकासात हातभार लावल्याचे समाधानही मिळणार आहे. –ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, भिवंडी महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deposit two thousand notes to pay property tax arrears in bhiwandi amy
First published on: 10-06-2023 at 13:43 IST