ठाणे : केंद्र सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेस पक्षाने वोट बँकेमुळे हा निर्णय घेतला नव्हता. पण, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय ऐतिहासिक असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शिवसेेनेचे पुर्ण समर्थन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणना निर्णयाचे स्वागत केले. काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला. गरिब हटला पण, गरीबी काही हटली नाही. परंतु ३५ कोटी जनतेला दारिद्रय रेषेतून वर काढण्याचे तसेच ८० कोटी जनतेला जीवनावश्यक वस्तु, अन्न धान्य देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला. शेतकरी आणि महिलांसाठी मोठे निर्णय घेतले. असे कठोर, धाडसी, लोकाभिमुख, जनहिताचे, देशहिताचे निर्णय घेण्यासाठी धाडस लागते आणि ते धाडस मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखिवलेले आहे, असे शिंदे म्हणाले.

काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांनी या विषयाकडे गांर्भीयाने पाहिले नाही. त्यांनी केवळ वोट बँकचे राजकारण केले. परंतु दलित, शोषित, पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका राहीली आहे. यातूनच त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर वोट बँकेचे राजकारण करणारी काँग्रेस आणि इंडिया आघाडीची अवस्था सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी झाल्याची टिका शिंदे यांनी केली. जातनिहाय जनगणेमुळे सामाजिक न्यायाचे महाद्वारे खुले होईल. जनगणनेमुळे प्रत्येक समाजाला त्यांची किती लोकसंख्या आहे, हे कळेल. या आकड्यांमुळे कल्याणकारी योजने राबविणे सोपे होईल. सर्वाना न्याय मिळेल, लोकांचा फायदा होईल. समाजातील आर्थिक विषमता कमी होईल, असेही ते म्हणाले. मोदी कुणाच्या दबावाखाली निर्णय घेत नाहीतर, ते देशहिताचे निर्णय घेतात, असेही ते म्हणाले.

मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील

पहलगाममध्ये झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडले पाहिजे, अशी देशवासियांची भावना असून त्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. काही निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक झाली. मोदी पाकिस्तानला चांगला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही आणि यापुढे पाकिस्तान देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिमत करणार नाही. मोदी पाकिस्तानचे नामोनिशाण मिटविण्याचा निर्णय घेतील, असे शिंदे म्हणाले.

काँग्रेसवर टिका

आतापर्यंत काँग्रेस सरकार होती. सैनिकांची मुंडकी कापून नेली जात होती. पण, काँग्रेस गपचुप बसत होती. आता पुलवामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानला घरात घुसून मारले होते. त्यामुळे आता भारत हा घरात घुसून मारणारा आहे. तसेच देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक झालेली आहे, याचा अर्थ आता मोठे पाऊल टाकले जाणार आहे. मोठा धडका आणि तोडीस उत्तर पाकीस्तानला दिले जाईल, असेही ते म्हणाले.