navi mumbai airport ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, नवी मुंबई विमानतळाला दी. बा पाटील यांचे नाव दिले जाईल असे आश्वासन दिले असले तरी, ज्या दिवशी खऱ्या अर्थाने विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव लागेल तो दिवस खऱ्या अर्थाने विजयाचा दिवस असेल, त्यामुळे लढा अजून संपलेला नाही, असे वक्तव्य सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केले.
नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन अवघ्या काही दिवसांवर आले असतानाही विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित होता. या विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी भूमिपूत्र लढा देत आहेत. अनेक राजकीय मंडळींनी देखील याविषयात उडी घेतली आहे. खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी काही दिवसापूर्वी नवी मुंबईत दी बा पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे यासाठी बाईक रॅली काढली होती. त्यानंतर, येत्या ६ तारखेला देखील त्यांनी या संदर्भात आंदोलन पुकारले होते. परंतू, त्याआधीच आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भूमीपूत्र संघटनांची, सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी सर्वांना आश्वासन दिले की, विमानतळाला दी.बा पाटील यांचेच नाव दिले जाईल. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत भेट झाली होती. त्यांच्यासोबत विमानतळाच्या नामकरणाबाबत चर्चा झाली, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दी.बा पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीनंतर खासदार सुरेश म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ‘बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झाला. परंतू, हा शब्द दोन ते तीन महिन्यात पाळला नाही तर, पाच लाखापेक्षा अधिक लोक जमा होतील आणि आंदोलन करतील असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.’
ते पुढे म्हाणाले, येत्या ८ तारखेला जरी विमानतळाचे उद्घाटन झाले. तरी, दोन महिने विमानतळ पूर्ववत सुरु व्हायला लागतील. यासर्व प्रक्रियेनंतर या विमानतळाला दी.बा पाटील यांचेच नाव दिले जाणार अशा प्रकारचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिला. त्यामुळे सर्व संघटना, स्थानिक भूमिपूत्रांचे यश मिळाले आहे. हा पहिला टप्पा आहे त्यात, आपण यशस्वी झालो. परंतू, अजून अंतिम टप्पा बाकी आहे. कारण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव दिले जाईल तो दिवस खरा सगळ्यांच्या विजयाचा दिवस असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनामुळे ६ ऑक्टोबरला होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. परंतू , हे आंदोलन थांबवलेले नाही. दी बा पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळाले तर, कोणीही याबाबतीत श्रेय घेऊ नये कारण, स्थानिक भूमिपूत्रांचे हे श्रेय आहे, असे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.