thackeray ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर सतत टीका सुरू असतानाच, ठाण्यातील तीन हात नाका येथे लावण्यात आलेल्या एका बॅनरने शहरात चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरवर “ये डर अच्छा लगा..! ई.डी, सीबीआय, चुनाव आयोग, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकडा राजा मेरा अभी सबपे भारी है,” असा मजकूर लिहून ठाकरे गटाने शिंदे गट आणि सत्ताधारी पक्षांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

हा बॅनर ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख तुषार रसाळ यांनी लावला असून, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या विधानांचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. बॅनरवर “ही सर्व वक्तव्येच सांगून जातात…” असा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “जिथे फायदा तिथे आम्ही युती करू, जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही” हे विधान लिहिले आहे. तसेच “महा आघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचे काम चालू आहे,” या नरेश म्हस्के यांच्या विधानाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

या दोन विधानांचा दाखला देत ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांमधील मतभेदांवर बोट ठेवले आहे. तसेच या बॅनरवर “ये डर अच्छा लगा..! ई.डी, सीबीआय, चुनाव आयोग, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकडा राजा मेरा अभी सबपे भारी है,” असा मजकूर लिहून ठाकरे गटाने शिंदे गट आणि सत्ताधारी पक्षांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने “राजा अजूनही भारी आहे” असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray)आणि राज ठाकरे (Raj thackeray) यांच्यात जवळीक वाढल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे कार्यकर्ते ठाण्यासह विविध ठिकाणी एकत्रितपणे आंदोलन करताना दिसत आहेत. त्यातच ठाण्यात ठाकरे गटाने बॅनरद्वारे शिंदे गट आणि सत्ताधारी पक्षांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच या बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.