डोंबिवली – अंबरनाथमध्ये रहिवास असलेल्या, पण मुंबईतील एका प्रसिध्द रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ असलेल्या एका ५२ वर्षाच्या डाॅक्टरने डोंबिवलीतील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढळले. या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्याकडून चूक झाली असे बोलून त्या महिलेशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी मानपाडा पोलीस ठाण्यात या डॉक्टर विरुद्ध तक्रार केली आहे.

पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. देखभाल दुरूस्तीच्या व्यवसायात ही महिला काम करते. सन २०२३ ते २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपले पती हदयरोगाने ग्रस्त होते. त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. अधिकच्या उपचारासाठी पतीला मी ठाण्यातील एका प्रसिध्द रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी आपल्या पतीचे गुडघ्याखाली दोन्ही पाय कापावे लागतील असे सांगितले.

यासंदर्भातची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईत प्रसिध्द रुग्णालयात सेवेत असलेल्या, पण ठाण्यातील रुग्णालयात मानद सेवा देणार्‍या एका अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरने केली. त्यानंतर या डॉक्टरशी आपल्या पतीच्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून संबंध आला. पतीचे औषधोपचार, काही मार्गदर्शनासाठी पीडित महिलेने संपर्क केला की संबंधित डॉक्टर पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन पतीला तपासून निघून जात होते. पतीची तब्येत खालावल्याने २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.

त्यानंतर संबंधित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर आपल्या तब्येतेची नियमित विचारपूस करायचे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलाला घरी येऊन दोन ते तीन तास मार्गदर्शन करायचे. त्या निमित्ताने घरी चहा, भोजन त्यांचे व्हायचे. आपला मुलगा बाहेरगावी शिक्षण घेत आहे याची माहिती डाॅक्टरांना होती. एक दिवस मी घरी एकटी असताना डाॅक्टरांनी आपणास काही बोलायचे आहे असे बोलून ‘माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. माझे आणि पत्नीचे पटत नाही. मी लवकरच तिला घटस्फोट देणार आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्याशी आपल्या मनाविरूध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तक्रारीत आहे.

आपणास मुली आहेत. आपण करता ते योग्य नाही, असे सांगुनही डाॅक्टरांनी त्या परदेशात जाणार आहेत. त्यामुळे त्यानंतर आपण लग्न करू, संसार करू असे बोलून पीडितेचा विश्वास संपादन करू लागले. आपल्या मुलालाही परदेशात शिक्षणासाठी पाठवू, असा विश्वास पीडितेला दिला.

काहीतरी निमित्त काढून डाॅक्टर आपल्या घरी येत होते. पत्नीशी आपले पटत नाही असे बोलून आपल्याशी शारीरिक संबंध ठेवत होते. दहा महिन्याच्या काळात आठवड्यातून ते तीन ते चार वेळा घरी येत होते. आपण लग्न करू असा त्यांचा शब्द होता. फेब्रुवारी २००४ मध्ये डाॅक्टरांच्या पत्नीने एक दिवस पीडित महिलेला थेट संपर्क केला. आपले डाॅक्टर पती तुमच्याकडे आले होते का अशी विचारणा केली. त्यावेळी होय म्हणताच, बाजुला उभ्या असलेल्या डाॅक्टरांनी त्याच मोबाईलवर समोर येऊन ‘माझी चूक झाली. मी तुला यापुढे भेटणार नाही. तुझ्याशी लग्न करणार नाही,’ असे बोलून मोबाईल ठेऊन दिला.

या संपर्कानंतर धक्का बसलेली पीडिता मानसिक आजाराने ग्रस्त झाली. ठाण्यातील प्रसिध्द रुग्णालयात या महिलेने मानसिक आजारावर उपचार घेतले. या आजारातून बाहेर पडल्यावर पीडित महिलेने मुंबईतील प्रसिध्द रुग्णालयातील ५२ वर्षाच्या अस्थिरोग तज्ज्ञ असलेल्या डाॅक्टर विरुध्द तक्रार केली आहे. संबंधित डाॅक्टर हे अंबरनाथमधील निवासी आहेत.