डोंबिवलीमध्ये आज पहाटे चार वाजल्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळेच उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाश्यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर भल्या पहाटेपासूनच गर्दी केल्याच चित्र पहायला मिळालं. प्राथमिक माहितीनुसार पाल वीज केंद्रामध्ये बिघाड झाल्याने विजपुरवठा खंडित झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात महावितरणाकडून अद्याप कोणतीही माहिती रहिवाशांना देण्यात आलेली नाही.
पहाटे चारच्या सुमारास डोंबिवलीमधील काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन साखर झोपेच्या वेळी वीज गेल्याने आणि प्रचंड उकाड्यामुळे ठीकठिकाणी लोक रस्त्यावर उभी असल्याचं चित्र दिसलं. नंतर बराच वेळ वाट पाहूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने बाजीप्रभू चौकामधील महावितरणाच्या कार्यालयासमोर रहिवाशांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. रहिवाशी संतप्त झाल्याने बाजीप्रभू चौकामधील महावितरणाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेकजण पोलिसांनाच आपली गाऱ्हाणी सांगतानाचं चित्र पहायला मिळालं.

मागील दोन दिवसांपासून डोंबिवलीमधील अनेक भागांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असताना असा वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित करण्यामागील कारण समजत नसल्याचं रहिवाश्यांचं म्हणणं होतं. तसेच एवढी देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद करुन कामं केली जातात तरी अशी वेळ का येते असंही नागरिकांचं म्हणणं होतं.
पाल वीज पुरवठा केंद्रातून पलावा मार्गे मानपाडा येथील विद्युत केंद्रात येणाऱ्या वीज वाहिनीत पहाटे चार वाजता बिघाड झाल्यामुळे डोंबिवली, कल्याण परिसराच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी साडेसात वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागाचा वीजपुरवठा बुधवारी, गुरुवारी सकाळी ते दुपारीपर्यंत काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी (२० एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात आलेला.
दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जूना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगितावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, व तुकाराम नगर फिडरवरील आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर, पाटकर शाळा या भागात गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचं कामं करण्यात आलेली.