डोंबिवली- आम्ही लष्करी जवान आहोत. आम्हाला तुमच्याकडून खोली भाड्याने घ्यायची आहे. असे डोंबिवलीतील एका रहिवाशाला दोन बनावट लष्करी जवानांनी सांगितले. आर्थिक व्यवहारासाठी घर मालकाची आवश्यक माहिती घेऊन, विश्वास संपादन करून मालकाची दोन लाख २४ हजार रूपयांची फसवणूक केली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव रोहिजी गुट्टे (३२, रा. देसलेपाडा, डोंबिवली पूर्व) अशी फसवणूक झालेल्या नोकरदाराची माहिती आहे.
पोलिसांनी सांगितले, माधव गुट्टे यांना दोन वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून रणदीप बन्सलीला सिंग, राजेंद्र सिंह शेखावत यांनी संपर्क केला. आम्ही जोधपूर येथून बोलत आहोत. आम्ही लष्करात जवान आहोत. आम्हाला डोंबिवलीत तुमच्या जागेत खोल्या भाड्याने घ्यायच्या आहेत, असे सांगितले. लष्करी जवान आपल्या खोलीत राहण्यास येणार म्हणून खोलीची इत्यंबूत माहिती, जवानांना काय मदत लागेल ती देण्याची तयारी माधव यांनी दाखविली. आम्हाला खोली भाड्याने घ्यायची असली की लष्कराच्या काही प्रक्रिया पार पाडव्या लागतात.
त्यासाठी त्यांनी माधव यांच्याकडून दोन लाख २४ हजार रूपये परत करण्याच्या अटीवर बँक व्यवहारातून मागवून घेतले. लष्करातील जवान बोलतात ते खरे असतील यावर विश्वास ठेऊन माधव यांनी स्वताच्या व पत्नीच्या एचडीएफसी, फेडरल बँकेच्या खात्यामधून दोन लाख २४ हजार रूपये लष्करी जवानांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा केले. पैसे जमा होताच, सारखे संपर्क करणारे जवान माधव यांचा मोबाईल क्रमांक उचलण्यास टाळाटाळ करू लागले. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नाही. त्यानंतर दोघांचे मोबाईल बंद झाले. आपली फसवणूक बनावट लष्करी जवानांनी केली हे लक्षात आल्यावर माधव गुट्टे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा अज्ञात व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. उपनिरीक्षक के. डी. गांगुर्डे या प्रकरणाचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत आहेत.