डोंबिवली : संततधार पाऊस थांबल्याने पालिका अभियंत्यांनी दोन दिवसांपासून डोंबिवली, कल्याण परिसरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे शास्त्रोक्त पध्दतीने भरण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिसांचे साहाय्य घेऊन काही वेळ रस्ता बंद ठेऊन खड्डे भरणीची कामे केली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खड्डे भरणी करताना पहिले खडी, त्यानंतर गिलावा आणि त्यावर बारीक खडीचा थर टाकून खड्डे बुजविले जात आहेत. भरलेले खड्डे तात्काळ वाहनांच्या वर्दळीने उखडून जाऊ नयेत म्हणून हा रस्ता पाच ते सहा तास वाहतूकीसाठी बंद ठेवला जात आहे. या कालावधीत संबंधित रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविली जात आहे. रविवारी डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले- गरीबाचापाडा रस्ता भागातील खड्डे वाहतूक बंद ठेऊन भरण्यात आले. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपअभियंता महेश गुप्ते, साहाय्यक अभियंता महेश गुप्ते, रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी, भिकाजी झाडे उपस्थित होते. रविवार सुट्टीचा दिवस असुनही अधिकाऱ्यांनी ही कामे स्वत: कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून करून घेतली.

पाऊस पूर्ण थांबला नसल्याने खड्ड्यात बारीक खडी टाकून रस्ता बुजविण्यात आला आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतली की बारीक खडीवर डांबर टाकण्यात येत आहे. सततच्या वाहन वर्दळीमुळे खड्डे उखडू नयेत म्हणून त्यावर डांबर टाकण्यात येत आहे, अशी माहिती उपअभियंता लिलाधर नारखडे यांनी दिली. डोंबिवली पश्चिम भागातील प्रत्येक रस्ता, गल्ली बोळातील अंतर्गत रस्ते अशाच नियोजनातून भरले जाणार आहेत, असे असे नारखडे यांनी सांगितले. कल्याण पूर्व, पश्चिम, टिटवाळा भागातील रस्ते खडी, त्यावर बारीक खडीचा थर टाकून भरले जात आहेत.

महिनाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची वाताहत केली. खड्डे भरणीची मे अखेरपर्यंतची कामे शहर अभियंता विभागाकडून पूर्ण करण्यात आली नाहीत. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर खड्डे वाढले आहेत. पावसात खड्डे बुजविणे पालिकेला शक्य न झाल्याने अखेर प्रवाशांच्या रोषाला शहर अभियंता विभागाला सामोरे जावे लागले. आता हा रोष कमी करण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंते प्रयत्न करत आहेत.

कल्याण-दुर्गाडी- भिवंडी बाह्यवळण रस्त्याने, शिळफाटा रस्त्याने ठाणे येथे जाण्यासाठी खड्ड्यांमुळे एक ते दोन तास लागत आहेत.  कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी वाहन कोंडीत अडकण्यापेक्षा प्रशासकीय काम वेळेत करता यावे यासाठी कल्याणमध्ये मुक्कामी राहणे पदभार स्वीकारल्यापासून पसंत केले आहे. आयुक्तांचा कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावरील बंगला माजी आयुक्तांनी खाली करेपर्यंत आयुक्तांना प्रतीक्षा करावी लागली. माजी आयुक्तांकडून आता बंगला खाली करण्यात आला आहे.

खड्डे भरणीची कामे शास्त्रोक्त पध्दतीने केली जात आहेत. पाऊस सुरू असल्याने डांबराचा वापर केला जात नाही. पावसाने उघडीप दिली की बुजविलेल्या खड्डयांवरील बारीक खडीवर डांबराचा थर टाकण्यात येतो.

-लिलाधर नारखडे, उपअभियंता, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali kalyan pothole filling works are full swing traffic police ysh
First published on: 25-07-2022 at 15:18 IST