एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, त्याचे आयुष्य पालटून जाते. तो एखाद्या विशिष्ट ध्येयाने, उद्देशाने आणि कामाने पूर्णपणे झपाटला जातो. आपले पुढील आयुष्य केवळ त्याच कामासाठी वाहून घेण्याचा मनाशी निश्चय करतो. समाजामध्ये अशी माणसे तशी कमीच, पण ही माणसे आपल्या कामाने इतरांपुढे आदर्श निर्माण करतात. अन्य लोकांसाठीही प्रेरणास्थान ठरतात. सध्याच्या काळात अपवाद वगळता प्रत्येक जण आपण आणि आपले कुटुंब एवढय़ाच वर्तुळापुरता मर्यादित असतो. त्यामुळे समाजासाठी काही करणे किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयाने काम करणे तसे विरळाच. नोकरी-व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर आता आराम करूम्हणणारेच जास्त. मात्र त्यालाही अपवाद असतात. डोंबिवलीचे अरुण ओक हे असेच सन्माननीय अपवाद.
पंच ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’त नोकरी, ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट टीम’ तसेच नवी मुंबईतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया येथे ‘एचटीपीआय’ स्कीममध्ये व्याख्याते, त्यानंतर स्वत:ची ‘विजया इन्फोटेक’ ही कंपनी स्थापन करून ‘सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग’ क्षेत्रासाठी सल्लागार म्हणून काम असा अनुभव ओक यांच्या गाठीशी जमा आहे. आता गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ओक यांनी गोसेवा, गोउत्पादन व संशोधन या कामाला वाहून घेतले आहे. बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव येथे स्वामी समर्थ संप्रदाय वाडी आहे. या वाडीतील गोशाळेचे सर्व व्यवस्थापन ओक पाहतात. या कामात अधिक सुसूत्रता यावी यासाठी ‘गोवर्धन गोवत्स पालन सोसायटी’ या विश्वस्त न्यासाची स्थापना करण्यात आली आहे.
अरुण ओक हे मूळचे रायगड जिल्हय़ातील. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा या गावचे. त्यांचे वडील केशव गोपाळ ओक हे वेदशास्त्रसंपन्न होते. त्यांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता. ओक यांचे बालपण दादर येथे गेले. छबिलदास शाळेत त्यांचे शिक्षण झाले. ९ एप्रिल १९४४ रोजी जन्मलेल्या ओक यांना पाच भाऊ. त्यात अरुण ओक यांचा चौथा क्रमांक. वडील गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची झाली. शिक्षण अर्धवट सुटते की काय असे वाटत असतानाच शाळेचे प्राचार्य एम. एल. जोशी आणि मुख्याध्यापक बापट यांच्यामुळे त्यांना शाळेची फी माफी मिळाली. त्या दोघांमुळे आपले शिक्षण (तेव्हाची अकरावी मॅट्रिक) पूर्ण होऊ शकले, असे ओक कृतज्ञतेने सांगतात. १९६१ च्या सुमारास ओक कुटुंबीय (आई व तीन भाऊ) डोंबिवलीत राहायला आले. दरम्यानच्या काळात शिकत असतानाच त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात दोन रुपये रोजावर ‘लिपिक’ म्हणून नोकरी केली. या काळात विद्युत मंडळातील पी.जी. कुलकर्णी, बी.एन. धर्माधिकारी या अधिकाऱ्यांचीही त्यांना मोलाची मदत झाली. या दोघांनीही पुढे शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.
पुढे मुंबईच्या राज्य विद्युत मंडळाच्या विभागीय कार्यालयात बदली, कार्ड पंचिंगचा अभ्यासक्रम, राज्य विद्युत मंडळात लोअर डिव्हिजन क्लार्क, मुंबई विद्यापीठात पंच ऑपरेटर म्हणून नोकरी, तिथून ‘कॅलिको केमिकल्स’मध्ये पंच ऑपरेटर, नंतर ‘फिलिप्स’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग सेंटर’ (ईडीपी) येथे व पुढे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमध्ये नोकरी असा प्रवास त्यांचा झाला. १९९८ मध्ये नोकरीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमधील नोकरी सोडल्यानंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया येथे सल्लागार म्हणून काही काळ काम केले.
या काळात ते बदलापूर-वांगणीदरम्यान असलेल्या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीचे संस्थापक श्री स्वामी सखा यांच्या ते संपर्कात आले. श्री स्वामी सखा यांनी सुमारे तेरा एकर परिसरांत १९९५ मध्ये ही वाडी स्थापन केली आहे. दत्त संप्रदायाचे विचार, आध्यात्मिक शिकवण याच्या प्रसाराचे काम येथून चालते. येथे गुरुपंचायतन मंदिरासह दत्तावतारातील सोळा प्रमुख अवतारांची तसेच सूर्यमंदिर, हनुमान, रेणुकादेवी मंदिर आणि गोशाळाही आहे. या वाडीत ते काम करू लागले. याच दरम्यान दूरचित्रवाहिनीवरील एक कार्यक्रम त्यांच्या पाहण्यात आला. शरद पाटील (जिल्हा- लातूर, गाव- मावळ, तालुका-अहमदपूर) यांच्यावर दाखविण्यात आलेल्या त्या कार्यक्रमात केवळ पाच गाईंच्या पाठबळावर पाटील यांनी त्यांच्या मुलीला डॉक्टरकीपर्यंतचे शिक्षण कसे दिले हे दाखविण्यात आले होते. हे पाहून प्रभावित झालेल्या ओक यांनी हे सगळे स्वामी समर्थ संप्रदाय वाडीच्या श्री स्वामी सखा यांना सांगितले. त्यांनी ओक यांना वाडीच्या गोशाळेचे काम पाहण्याची सूचना केली आणि ओक यांचे गोसेवेचे काम सुरू झाले.
कामाला सुरुवात केल्यानंतर भिवंडीजवळील अनगाव, नेरळजवळील नसरापूर येथील गोशाळा, औरंगाबाद येथील पोटुळ गावी सुधीर विद्वांस यांचे सुरू असलेले गोसेवेचे काम आणि अशा प्रकारचे काम जेथे जेथे सुरू आहे त्या त्या ठिकाणी ओक यांनी भेट दिली. गोमूत्रापासून अर्कनिर्मिती, साबण, कीटकनाशके, फिनेल तयार करणे याचे प्रशिक्षण घेतले. संकरित गाईंची निर्मिती करणे ते गोसेवा व अन्य आनुषंगिक कामांची सर्व माहिती त्यांनी घेतली. काही कार्यशाळांमध्येही ते सहभागी झाले. या सगळ्या कामात त्यांना डॉ. नितीन मरकडेय, मिलिंद देवल, डॉ. विनायक रानडे या तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व आजही मिळते आहे.
गोमूत्र आणि पंचगव्य (गाईचे गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप) यावर वेगवेगळे प्रयोग व संशोधन होत आहे. पाश्चिमात्य देशातही यावर संशोधन सुरू आहे. गोमूत्र सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, गोमूत्रापासून तयार केलेली औषधे मधुमेह, कर्करोग आणि अन्य विकारांवरही उपयोगी ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आमच्या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीच्या गोवर्धन गोवत्स पालन सोसायटीतर्फेही आम्ही यावर काम व संशोधन करत आहोत. वेगवेगळ्या आजारांवर विविध प्रकारचे आठ गोमूत्र अर्क तसेच दंतमंजन, उटणे, साबण, गोघृत, वातावरणशुद्धी स्प्रे, गोमूत्र फिनेल, फेसपॅक आणि अन्य उत्पादने तयार करायची आहेत. या सर्व उत्पादनांची निर्मिती आणि विक्री यासाठी शासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया आम्ही सुरूकेली आहे. रीतसर मान्यता मिळाल्यानंतर आमची ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणली जातील. सध्या आमच्या गोशाळेत १२ गाई, ५ वळू आणि ८ वासरे असल्याची माहितीही ओक यांनी दिली.
गाय मेल्यानंतर तिचा मृतदेह वर्षभर जमिनीत पुरून ठेवला तर त्यापासूनही उत्तम असे खत तयार होते. ते शेतीसाठी उपयुक्त ठरते. गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांची ऑनलाइन विक्रीही चांगली होत आहे. गीर जातीच्या एका गाईची किंमत सुमारे ४० हजार, तर थारपारकर जातीच्या एका गाईची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असते. माणसाप्रमाणे गाईलाही रक्तदाब असतो. एका गाईला दररोज सुमारे ६ किलो ओले गवत, ६ किलो सुका चारा (त्यात मिठाच्या व गुळाच्या पाण्याचा थोडासा शिडकावा) लागतो, अशी माहितीही ते गप्पांच्या ओघात देतात. अरुण ओक यांच्या या कामात त्यांना मुलगा मनोज, सून मानसी, नातू मोहित, मुलगी ऋजुता जोशी, जावई भूषण यांचा नैतिक व सक्रिय पािठबा आहे. अनुभव, वाचन, अभ्यास यातून शिकत गेलो. पंचगव्यावर संशोधन व त्यापासून उत्पादन निर्मिती यावर आता काम करायचे ठरविले असल्याचे ओक सांगतात.