डोंबिवली – सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानांना खाऊ घालू नका. याठिकाणी ती रात्रीच्या वेळेत त्रास देतात, अशी सूचना डोंबिवली पूर्वेतील कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बालाजी गार्डन आवारातील दोन रहिवाशांनी या भागातील एका केबल चालकाला केली. त्याचा राग येऊन या केबल चालकाने स्वतासह आपल्या आठ साथीदारांच्या साहाय्याने या दोन रहिवाशांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.

कोपर पूर्वेतील बालाजी गार्डन आवारात शनिवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. शालिक रतन भगत (५४) असे मारहाण करणाऱ्या केबल चालकाचे नाव आहे. ते बालाजी गार्डन संकुलात इमारत क्रमांक आठमध्ये राहतात. गुन्हा दाखल केबल ऑपरेटर शालिक भगत यांनी आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी केलेल्या मारहाणीत बालाजी गार्डन संकुलात इमारत क्रमांक सातमध्ये राहणारे श्रीकांत जगन्नाथ पाटील (३९) आणि त्यांचा मित्र भावेश शेरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. ते नोकरदार आहेत.

तक्रारदार श्रीकांत पाटील यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी रात्री मी स्वता आणि माझा मित्र भावेश शेरकर हे बालाजी गार्डन आवारात रात्रीच्या वेळेत फिरत होतो. यावेळी सोसायटी आवारात भटके श्वान संचार करत होते. बालाजी गार्डन गृहसंकुलातील रहिवासी भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे त्रस्त आहेत. सोसायटी आवारात घाण करणे, सदस्यांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार नियमित होतात. शाळकरी मुले शाळेत जातात. त्यामुळे मुले या श्वानांना घाबरतात.

आम्ही सोसायटी आवारात फिरत असताना सोसायटी आवारात केबल ऑपरेटर शालिक भगत हे सोसायटी आवारात भटक्या श्वानांना बिस्किटे खाऊ घालत होते. त्यावेळी तक्रारदार पाटील यांनी सोसायटी आवारात भटक्या श्वानांंना बिस्किटे खाऊ घालू नका, असे सांगितले.

त्याचा राग येऊन शालिक भगत यांनी पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. आपण फक्त तुम्हाला सूचना केली आहे. तुम्ही मला का मारता असे प्रश्न पाटील यांनी केले. पाटील यांना शालिक भगत यांनी ठोशांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी शालिक यांचे इतर सात ते आठ साथीदार तेथे आले या सर्वांनी मिळून भावेश, पाटील यांना मारहाण केली.

हा वाद सोडविण्यासाठी पाटील यांचे मित्र भावेश मध्ये पडले तर त्यांच्या नाकावर ठोसा मारून शालिक यांनी त्यांना रक्तबंबाळ केले. त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली. रामनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

कल्याण, डोंबिवली परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. मासळी बाजार, शहरातील मुख्य, अंतर्गत रस्ते भागात भटक्या श्वानांच्या झुंडी अचानक पादचारी, वाहन चालकांच्या अंगावर चालून येत आहेत. गेल्या महिन्यात कल्याणमध्ये एकाच वेळी भटक्या श्वानांच्या हल्ल्यात ६५ जण जखमी झाले होते. भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण आहेत.