डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत चोरट्यांनी आता मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या भागाला लक्ष्य करून घरफोड्या सुरू केल्या आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या छेडा रस्त्यावरील ज्येष्ठ पुरोहित लक्ष्मण पारेकर गुरूजी यांच्या अध्यात्मिक कार्यालयासह लगतची एकूण तीन व्यापारी गाळे तोडून चोरी केली आहे. एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक चोरटा कैद झाला आहे.
टोपी घालून आपली ओळख लपवून हा चोरटा दुकानात पैसे, किमती ऐवज मिळतो का याची तपासणी करत असल्याचे एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसत आहे. या चोरट्याचे अन्य साथीदार या दुकानांच्या बाहेर पाळत ठेवण्यासाठी उभे असावेत असा पोलिसांना संशय आहे. लोखंडी कटावणीने या गाळ्यांची कुलपे आणि लोखंडी प्रवेशद्वारे तोडून चोरट्यांनी या चोऱ्या केल्या आहेत.
छेडा रस्त्यावर ज्येष्ठ पुरोहित लक्ष्मण पारेकर गुरूजी यांचे एका गाळ्यात कार्यालय आहे. त्याच्या बाजुला देवपुजेसाठी लागणाऱ्या साहित्याचे सुगंधी भांडार आहे. त्या लगत एका झेराॅक्स दुकान आहे. छेडा रस्त्यावर पेंडसेनगर भागात एका किराणा दुकान आहे. या दुकानातही चोरट्यांनी चोरी केली आहे. पारेकर गुरूजी यांच्या गाळ्याच्या शेजारी एक संगणक प्रशिक्षण वर्गाचे केंद्र आहे. या केंद्रात लॅपटाॅप होते. या केंद्राचा मुख्य प्रवेशद्वार तोडण्यात आले आहे.या चोरीप्रकरणी पूजा साहित्य सुगंधी भांडारचे मालक प्रशांत सखाराम खाडे (५०) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात इतर तीन घरफोड्या झालेल्या नागरिकांच्यावतीने तक्रार केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास या चोऱ्या करण्यात आल्या आहेत.
तक्रारीत म्हटले आहे, छेडा रस्त्यावरील कुवर बाग सोसायटी, न्यू जयश्री सोसायटीच्या तळमजलेल्या असलेल्या व्यापारी गाळ्यांमध्ये काही दुकाने, काही आस्थापना आहेत. पारेकर गुरूजी यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन करणारे कार्यालय आहे. संतोष साळी यांचे संगणक मार्गदर्शक केंद्र, दिनेश चौधरी यांचे किरणा दुकान आहे. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गाळेधारकांनी आपली दुकाने, कार्यालये बंद केली. पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी शनिवार ते रविवार मध्यरात्रीच्या सुमारास येऊन धारदार कटावणी किंवा लोखंडी अवजाराने एकेक करून प्रत्येक गाळ्याच्या समोरील लोखंडी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. दुकानात, गाळ्यात प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम, किमती ऐवज चोरण्याचा प्रयत्न केला. सकाळी दुकानदार, गाळेधारक आपली दुकाने, आस्थापना उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना आपल्या दुकानाचे मुख्य दरवाजे उघडे आणि तोडल्या अवस्थेत असल्याचे दिसले. ही माहिती तात्काळ रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या चारही ठिकाणची पाहणी करून तक्रारदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
