कल्याण : राज्याचा कायापालट करायचा असेल तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेच पाहिजेत. आजच्या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तीच भावना व्यक्त केली आहे. आजच्या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून येत्या काळात राज्यातील वातावरण लोकमानसाला अपेक्षित असलेले असेच असेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली.

दोन्ही पक्षांची विचारधारा एक आहे. विकास कामांच्या विषयांंवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच आक्रमक असतात. उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना विकास कामांचा सपाटा त्यांनी लावला होता. हे काहींना पाहवले नाही. त्यामुळे नंतरच्या घडामोडी घडल्या. शिवसेनेत काहींनी दुभंग घडून आणला. शेवटी राजकीय कालचक्र कायमस्वरुपी एकाच जागी राहत नाही. त्याप्रमाणे आता कालचक्राचा फेरा चुकला आहे.

राज्याला खमकेपणाने काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे. ती गरज पूर्ण होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. हेच आजच्या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते , राज्यातील जनतेला दिसून आले आहे. राज्यातील प्रत्येक माणूस आता उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची वक्तव्य करत आहेत. ते चित्र लवकरच साकार होईल, अशी अपेक्षा आहे, असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

मनसेचे डोंंबिवली जिल्हाप्रमुख राहुल कामत यांनीही आमची विचारधारा एक आहे. दोन्ही पक्षांना भविष्यवेधी, लक्ष्यवेधी कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वी मनसेची ज्या महापालिकांमध्ये सत्ता होती. तेथे शहर विकासाचे कार्यक्रम राबवून मनसे काय करू शकते ते दाखवून दिले आहे. राज्य विकासाची एक मोठी संकल्पना राज ठाकरे यांच्याकडे आहे.

मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी विकासाचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे विकासाचा वेध आणि त्याची अंमलबजावणी करणारे हे दोन्ही नेते एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. ते चित्र लवकरच साकारेल, असा विश्वास आहे. आजच्या विजयी मेळाव्याने ते दाखवून दिले आहे, असे मनसेचे शहरप्रमुख राहुल कामत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उध्दव आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते शिंदे शिवसेनेला तगडे आव्हान निर्माण करतील अशा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत.