डोंबिवली : डोंबिवलीत विविध प्रकारची नागरिकांची श्रध्दा स्थाने आहेत. त्यामधील एक डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्ता. फडके रस्त्यावर श्री गणेश मंदिर, विविध प्रकारच्या वस्तूंची बाजारपेठ, मित्र-मैत्रिणींना चहा नाष्टाचा आस्वाद घेत गप्पा मारण्यासाठीचा कट्टा आहे. डोंबिवलीत अनेक वर्ष न दिसणारा, न भेटणारा नागरिक हमखास फेरी मारल्यावर नजरेस पडतो. असा हा फडके रस्ता दिवसभर नागरिक, वाहनांंची गजबजलेला असतो. पण, हाच फडके रस्ता मध्यरात्र ते पहाटेच्या वेळेत शुकशुकाटामुळे मोकळा श्वास घेत असतो. आणि अवकाळी पाऊस आला की नागरिकांची त्रेधातिरपीट उडवत नागरिकांना रस्त्यामधून बाजूला करून स्वता पावसाचा आनंद लुटतो.
डोंबिवली लहानसे खेडेगाव होत. गावाच्या वेशीवर ठाकुर्ली दिशेने दलदल, वनराईच्या भागात गावचे ग्रामदैवत गणपतीचे लहान मंदिर होते. गावात खडी मातीचे कच्चे रस्ते होते. संंध्याकाळच्या वेळेत दिवाबत्तीची वेळ झाली की गावातील मुख्य रस्ते, चौकात शेणाचे कुंंट पेटवून पादचाऱ्यांना उजेडाची सोय करून देण्यात येत होती. ग्रामपंचायतीचा कारभार होता. गावातून गणपती मंदिर दिशेने दलदलीतून जावे लागत होते. पावसाळ्यात रानगवत, झुडपांमुळे गणपती मंंदिरापर्यंत जाण्याची हिम्मत कोणी करत नसे.
मंदिरात नियमित दिवाबत्ती झाली पाहिजे. तेथे दररोज जाता आले पाहिजे म्हणून डोंबिवली गाव ते आताच्या फडके रोडने गणपती मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुस्थितीत रस्ता पाहिजे असा विचार डोंबिवली गावातील बापूसाहेब फडके आणि इतर जाणकार मंडळींनी केला. या कामासाठी निधीची गरज होती. त्यावेळी कल्याणला जाऊन खासदार दिवंगत राम कापसे यांची जाणकारांंनी भेट घेतली. कापसे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीतून फडके रस्त्याची बांधणी करण्यात आली. बापूसाहेब फडके यांनी केलेल्या प्रयत्नांंमुळे या कामासाठी निधी मिळाला आणि त्यांच्या पुढाकाराने या रस्त्याची बांधणी झाली म्हणून या रस्त्याला बापूसाहेब फडके यांचे नाव देण्यात आले, असे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येते.
दिवसभर वाहने, नागरिक, व्यापाऱ्यांंनी गजबजून गेलेला फडके रस्ता. रात्री १२ ते पहाटे चार पर्यंत सामसूम असतो. पहाटे चार वाजल्यापासून शहराच्या विविध भागातील लोक फिरण्यासाठी बाहेर पडतात. व्यापारी, विक्रेत्यांच्या हालचाली सुरू होतात. आणि फडके रस्त्यावर पहाटे चारपासून ते रात्री बारा पर्यंत पुन्हा गजबज सुरू होते. शहरातील अनेक हौशी दुचाकी स्वार रात्रीच्या वेळेत फडके रोडवर शुकशुकाट असल्याने आपल्या महागड्या दुचाकी गाड्या घेऊन फडके रोडवर नागरिकांची झोप मोड करत दुचाकी चालवितात.काही गप्पीष्ट दुकानांच्या पायऱ्यावर बसून झुरके मारत पहाटेपर्यंत गप्पांमध्ये रमलेले असतात. परदेशातून मित्र आले की त्यांना भेटण्याचे ठिकाण फडके रस्ता.पहाटे पाचनंतर फडके रस्त्यावरील वर्दळ वाढू लागते. मग, रात्री १२ पर्यंत फडके रस्त्याला श्वास घेण्यास जागा नसते.
दिवसा, रात्री कधीही अवकाळी पाऊस आला की मात्र नागरिक, व्यापारी, विक्रेते यांची त्रेधातिरपीट उडते आणि फडके रस्ता पावसात न्हाऊन निघतो. आता परतीचा पाऊस गेला. अशा चर्चा सुरू असताना दिवाळीच्या पाचही दिवसांंमध्ये माघारी पावसाने हजेरी लावली आणि फडके रस्त्यावर त्रेधातिरपीटीचा खेळ नागरिकांना पाहण्यास, अनुभवण्यास मिळाला.