डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंबिवली भागात बनावट सात बारा उताऱ्यांच्या आधारे कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता भूमाफियांनी दोन बेकायदा इमारती उभारल्या. या बनावट सात बारा उताऱ्यांच्या आधारे कल्याणमधील सह दुय्यम निबंधक क्रमांक ४ या कार्यालयातून विकास करारनामाची दस्त नोंदणी करून या इमारतींमधील सदनिकाना नागरिकांंना विकून शासन, घर खरेदीदारांची फसवणूक केली. अशा २४ भूमाफियांविरुध्द प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशावरून डोंबिवली मंडल अधिकाऱ्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला.

या बनावट सात बारा उतारा प्रकरणात एक माजी नगरसेवक, माजी नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग आहे. २०१६ ते २०२० या कालावधीत हे बेकायदा व्यवहार करण्यात आले आहेत. माहिती कार्यकर्ते कल्पेश जोशी यांनी शासनाकडे या दोन बेकायदा इमारत, बनावट सात बारा उतारा प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. उच्च न्यायालयाने डोंबिवली पश्चिमेतील सरकारी जमिनींंवरील १४ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. या इमारतींमध्ये या दोन्ही बेकायदा इमारतींचा समावेश आहे. पालिकेच्या ह प्रभाग हद्दीत या इमारती येतात.

तक्रारदार जोशी यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी या प्रकरणातील तथ्य पडताळून बनावट सात बाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सचिन शेजळ यांना दिले होते. चौकशीत सात बारा उतारे बनावट आढळले. यासंदर्भातचा अहवाल प्रांत गुजर यांना प्राप्त होताच, त्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

माजी नगरसेवक सहभाग

याप्रकरणात माजी नगसेवक रणजित रामदास जोशी, माजी नगरसेवकाचा मुलगा प्रवीण रमेश म्हात्रे यांचा सहभाग आहे. एकदंत डेव्हलपर्सचे भागीदार महेश पार्टे, साईशक्ती नार्वेकर, यशवंत जोशी, रवींद्र जोशी, महेश बिभीषण जोशी, विनोद बिभीषण जोशी, राजेंद्र शेरेगर, अशोक भानजी जोशी, अशोक पांडुरंग जोशी, माया पाटील, बानुबाई जोशी, दमयंती जोशी, भारत पाटील, साधना तांंबे, वंदना जोशी, लक्ष्मीबाई जोशी, विमल जोशी, मार्गेश जोशी, शशिकांत जोशी, महालक्ष्मी एन्टरप्रायझेसचे लोकशे गावडा, वर्षा विजय पंडित, विजय गजानन पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे तक्रार

मंडळ अधिकारी जमदरे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, जोशी यांच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल २४ व्यक्तिंनी जुनी डोंबिवलीतील नवीन सर्व्हे क्रमांक १६-१४, स. क्र. २६-१५, स. क्र. २६-१६-१ (अ), मौजे नवी डोंबिवलीतील स. क्र. ६३-२(ब) जमिनींचे बनावट सात बारा उतारे तयार केले. या उताऱ्यांचे आधारे विकास करारनामे सह दुय्यम निबंधक, कल्याण ४ कार्यालयात दस्त नोंदणीकृत केले. या जमिनींवर बेकायदा इमारती उभारून त्यामधील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीदारांना विकल्या. मानपाडा पोलीस, महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तथ्य आढळल्याने याप्रकरणी महसूल विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.