डोंबिवली- येथील पूर्व रेल्वे स्थानकातील रामनगर तिकीट खिडकीजवळील जिन्या जवळ पहाटे पासून सकाळी आठ वाजेपर्यंत अनेक रिक्षा चालक रस्ता अडवून प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना अडथळे पार करत रेल्वे स्थानकात जावे लागते.
सकाळी आठ वाजता वाहतूक पोलीस कर्तव्यावर आले की हेच रिक्षा चालक रांगेतून प्रवासी वाहतूक करतात.अनेक नोकरदारांचे घरातील सदस्य दुचाकी, पाऊस असेल तर चार चाकी वाहनाने रेल्वे स्थानक भागात आपल्या घरातील महिला, पुरूष सदस्याला डोंबिवली पूर्व स्थानकातील रामनगर तिकिट खिडकी परिसरात सोडण्यासाठी येतात. या वाहन चालकांना रेल्वे प्रवेशव्दारा समोरील रिक्षांचा मोठा अडथळा येतो.दुचाकी, चारचाकी माघारी जाण्यासाठी वळण घेणे शक्य होत नाही. रिक्षा चालक प्रवासी मिळाल्या शिवाय रस्त्यावरील रिक्षा हटवित नाहीत. रिक्षा चालकाला रिक्षा बाजुला घेण्याची सूचना केली तर आत्ताच रिक्षा बाहेर काढली आहे. प्रवाशांची वाट पाहत आहे. बोहनीची वेळ आहे, अशी कारणे देऊन रिक्षा चालक रस्त्यावरुन बाजुला हटण्यास तयार होत नाही, अशा तक्रारी डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी केल्या आहेत.
हेही वाचा >>>“शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी आली पण…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
डोंबिवली वाहतूक विभागाने सर्व रिक्षा चालकांना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर प्रवाशांना घेणे आणि सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे फलक डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या चहूबाजुने लावण्यात आले आहेत. तरीही रिक्षा चालक त्याकडे कानाडोळा करतात.रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वाहतूक विभागाने रस्ते अडवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर नजर ठेवली आहे. जे रिक्षा चालक नियमभंग करतील त्यांना दंडात्मक ई चलन पाठविले जाते. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात रेल्वे स्थानक प्रवेशव्दार, जिने अडवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामुळे ठाण्यात कोंडी
रेल्वे प्रवेशव्दाराच्या बाजुला रिक्षा चालकांकडून सेवाशुल्क वसूल करणारे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी बसलेले असतात. त्यांच्याकडे प्रवाशांनी बेशिस्त रिक्षा चालकाची तक्रार केली की ते रिक्षा चालक आमचे ऐकत नाहीत. त्यांना बाजुला करणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे, अशी बेजबाबदार उत्तरे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी देतात, असे प्रवाशांनी सांगितले.जे रिक्षा चालक प्रवेशव्दार अडवून व्यवसाय करतात त्यांची माहिती सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून मिळवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि ते रिक्षा चालक सराईत असतील तर त्यांचा रिक्षा चालक परवाना काही महिन्यासाठी निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव उपप्रादेशिक विभाग कल्याण येथे पाठविला जाईल, असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.