डोंबिवली : कोकणातून गणपतीहून परत डोंंबिवलीतील घरी परतणाऱ्या एका ७६ वर्षाच्या महिलेने डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ठाकुरवाडी भागात जाण्यासाठी थेट भाड्याची रिक्षा केली. या महिलेचा प्रवास सुरू होताच, एक ४० वर्षाची महिला जबरदस्तीने एका लहान बाळाला घेऊन रिक्षेत बसली. वृध्देने आपण थेट जात आहोत असे सांगुनही महिला जबरदस्तीने रिक्षेत बसून तिने प्रवासाच्या काळात महिलेच्या पिशवीतील सोन्याची साखळी आणि अंगठी असा एकूण ५८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.
ही महिला रिक्षेत बसल्यानंतर काही वेळाने वृध्देच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीला पाठीमागून हात लावला. त्यावेळी वृध्देने तिला जाब विचारला होता. लहान मुल जवळ असल्याने वृध्द महिलेने त्या महिलेला रिक्षेत घेतले. लहान मूल घेऊन बसलेली महिला चोरटी असल्याचे उघड झाले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात आता रिक्षेत बसुनही काही महिला चोरी करू लागल्या आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया भोसले (७६) या कुटुंबीयांसह डोंबिवली पश्चिमेतील दिनदयाळ रस्त्यावरील ठाकुरवाडी भागात राहतात. त्या कोकणात गणपतीसाठी गेल्या होत्या. त्या गेल्या शुक्रवारी कोकणातून डोंबिवलीत परतल्या. त्यांच्या जवळील बटव्यात सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी आणि प्रवास खर्चासाठी सुमारे पाच हजार रूपये असा ऐवज होता. डोंबिवली पश्चिमेत शुक्रवारी दुपारी आल्यानंतर त्यांनी पंडित दिनदयाळ चौकातील रिक्षा वाहनतळावरून ठाकुरवाडीतील घरी जाण्यासाठी थेट भाड्याने जाण्यासाठी रिक्षा केली.
रिक्षा सुरू होताच पाळत ठेऊन असलेली एक ४० वर्षाची महिला लहान मूल घेऊन रिक्षेत बसू लागली. यावेळी विजया यांनी आपण थेट भाडे करून ठाकुरवाडीत जात आहोत असे सांगितले. महिलेचे लक्ष विजया यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि पिशवीवर होते. चोरट्या महिलेने आपणासह ठाकुरवाडीत जायचे आहे असे बोलून जबरदस्तीने ती विजया भोसले यांनी केलेल्या रिक्षेत बसली. रिक्षा पुढे गेली. त्यावेळी महिलेने विजया भोसले यांच्या पाठीमागून गळ्यातील सोनसाखळीला हात लावून ती काढण्याचा प्रयत्न केला. विजया यांनी तिला जाब विचारताच, तेव्हा आपण हात लावला नाही. असे ती महिला म्हणू लागली. महिलेने आपली पिशवी विजया यांच्या जवळ खेटून ठेवली होती.
रिक्षेत असताना हात चलाखी करून भुरट्या महिलेने विजया यांच्या जवळील बटव्यातील सोनसाखळी, अंगठी आणि साडे चार हजार रूपयांची रक्कम शिताफीने काढून घेतली. विजया रिक्षा चालकाला भाडे देऊन घरी निघून गेल्या. आपण पोहचलो हे गावी सांगण्यासाठी विजया यांनी बटव्यातून मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना बटव्यात बांधलेली सोन्याची गाठोडी मिळून आली नाही. कोकण ते डोंबिवली प्रवासात हा ऐवज सोबत होता. आता लगेच कुठे गेला असा प्रश्न त्यांना पडला. रिक्षेत जबरदस्तीने बसलेल्या महिलेनेच तो चोरून नेला असण्याचा संशय व्यक्त करत विजया भोसले यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पालिकेचे रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे भुरटी महिला पकडतान पोलिसांना कसरत करावी लागणार आहे.