डोंबिवली – विदेशी कंपनीत गुंतवणूक केली की दररोज दोन ते तीन तासात ४० ते ५० हजार रूपये मिळतात, असे आमिष एका जुन्या सहकाऱ्याने आपल्या एका परिचित नोकरदाराला दाखविले. या ओळखीचा गैरफायदा घेऊन इसमाने विदेशी कंपनीतील गुंतवणुकीच्या माध्यमातून एक नोकरदार आणि त्याची पत्नी यांची एकूण सहा लाख ३३ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील दावडी भागात राहणारे निखील परांजपे यांनी या फसवणूक प्रकरणी ठाणे वसंतविहार भागात राहणारे नयन सुनील गाठे यांच्या विरूध्द तक्रार केली आहे. तक्रारदार निखील परांजपे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपण यापूर्वी भांडुप येथील एक वाहन कंपनीत नोकरीला होतो. तेथे फसवणूक करणारे नयन गाठे हेही नोकरीला होते. आपण भांडुप येथील नोकरी सोडून कुर्ला येथील वाहन कंपनीत कामाला लागलो. या कालावधीत नयन गाठे आपल्या संपर्कात होते.

ते आपणास विदेश कंपनीत गुंतवणूक केली की दोन ते तीन तासाच्या कालावधीत ४० ते ५० हजार रूपये आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे आपणही माझ्या सांगण्याप्रमाणे विदेशी कंपनीत गुंतवणूक करा आपणासही झटपट चांगला आर्थिक लाभ अल्पावधीत होईल. तक्रारदार परांजपे यांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. गाठे परांजपे यांनी गुंतवणूक करावी म्हणून आग्रही होते. आपली कंपनी नसून पोर्टल वरून वस्तू खरेदी करून त्या विक्रीतून हा नफा होतो, असे गाठे परांजपे यांना सांगत होते. सततच्या आग्रहामुळे तक्रारदार निखील परांजपे गुंतवणुकीचा निर्णय घेतला. कंपनीत पहिले चार ते पाच लाख गुंतवावे लागतील, असे गाठे यांचे सहकारी सांगू लागले. आपणाकडे एवढे पैसे नाहीत असे सांगून परांजपे घरी परतले. त्यानंतरही नयन गाठे परांजपे यांना संपर्क करून गुंतवणुकीसाठी आग्रह करत होते.

आपण कर्जाच्या माध्यमातून ती रक्कम भरा, असे तो सांगत होता. सततच्या मागणीमुळे परांजपे यांनी वैयक्तिक कर्जासाठी आपली सर्व कागदपत्रे गाठे यांना दिली. ठाण्यातील एका खासगी वित्त संस्थेतून तीन लाख ८१ हजाराचे कर्ज मिळविण्यात आले. गाठे यांच्या सूचनेप्रमाणे ती रक्कम परांजपे यांनी गुगल पे माध्यमातून गाठे यांच्या बँक खात्यात जमा केली. सिंगापूर येथे आपल्या कंपनीचे कार्यालय आहे सांगण्यात आले.

गाठे यांच्या सूचनेवरून परांजपे यांच्या पत्नीने दोन लाख ८३ हजार गाठे यांच्या बँक खात्यावर गुंतवणुसाठी ऑनलाईन माध्यमातून पाठविले. खासगी कंंपनी व्यवसायाचा परवाना काढून देतो असे आश्वासन गाठे यांनी परांजपे यांना दिले. दरम्यान, परांजपे यांच्या पत्नीचे नावे ५७ हजार रूपयांचे घड्याळ परांजपे दाम्पत्याने मागणी न करता आले. त्याचे देयक त्यांच्या बँक खात्यातून वळते करण्यात आले होते. त्यामुळे परांजपे यांचा गुंतवणुकी विषयी संशय बळावला. गाठे यांनी परांजपे यांच्याकडून स्वीकारलेली रक्कम कोठेही न गुंतविता, त्या रकमेवरील आकर्षक परतावा न देता आपली फसवणूक केली म्हणून नयन गाठे यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.