डोंबिवली : मी राजू पाटील यांचा नातेवाईक आहे, असे पादचाऱ्यांना सांगून, त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील सोन्याचा किमती ऐवज काढून घेऊन पळून जाण्याचे प्रकार डोंंबिवली शहरात मागील चार महिन्यांपासून वाढले आहेत. जून महिन्यात मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट भागात सार्वजनिक रस्त्यावर दुबईहून आलेल्या एका डोंबिवली निवासी नागरिकाला राजू पाटील यांचे नाव सांगून लुटले होते. गेल्या पाच दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेतील भाजी बाजारात एक ज्येष्ठ नागरिकाला राजू पाटील यांचे नाव सांगून लुटण्यात आले आहे.

आतापर्यंत पादचाऱ्यांना भुरळ घालून लुटण्यात येत होते. आता एक ५० वर्षाचा इसम पायी चाललेल्या वृध्द, ज्येष्ठ नागरिकाजवळ येतो. त्यांना आपण राजू पाटील यांचा मी नातेवाईक आहे असे सांगतो. या बोलण्याच्या गडबडीत पादचाऱ्या जवळील सोन्याचा ऐवज काढून घेऊन भुरटा इसम पळून जातो. यामध्ये ६५ ते ८० वयोगटातील पादचाऱ्यांना सर्वाधिक लक्ष्य केले जात आहे. गेल्या जूनमध्ये दुबईमधील एक कार्पोरेट तेथील नोकरी सोडून डोंबिवलीत आला आहे. ते आपल्या दुचाकीवरून मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट येथे सामान खरेदीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांना पाठीमागून एक इसमाने हाक मारून थांबवले. त्या इसमाने दुचाकी स्वाराच्या जवळ येऊन मी राजू पाटील यांचा नातेवाईक आहे, असे सांगून दमदाटी करून त्या नागरिकाजवळील रोख रक्कम काढून घेतली.

वाढीव रक्कम दिली नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकाराने घाबरलेल्या नागरिकाने ऑनलाईन माध्यमातून त्या इसमाला दहा हजाराची रक्कम वर्ग केली आणि त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. या इसमाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्या तक्रारीचा भीतीने पाठपुरावा केला नाही. अशाच प्रकारची आणखी एक घटना मंगळवारी डोंबिवली पूर्वेतील भाजी बाजार भागात घडली. ठाकुर्ली चोळेगाव संतवाडी भागात राहणारे राजेंद्र जनार्दन नायर मंगळवार संध्याकाळी चार वाजता डोंंबिवली पूर्व भाजी बाजारात खरेदीसाठी आले होते. तेवढ्यात त्यांच्या समोर एक ५० वर्षाचा इसम येऊन उभा राहिला. मी राजू पाटील यांचा नातेवाईक आहे, असे बोलून या इसमाने तक्रारदार राजेंद्र नायर यांना बोलण्यात गुंतून ठेवले. बोलत असताना राजेंद्र नायर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि हातामधील अंगठी असा एकूण एक लाख सहा हजार रूपयांचा काढून घेतला.

तुम्ही वृध्द आहात. हल्ली भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे असा ऐवज कधी घालून फिरू नका. असे बोलत राजेंद्र यांच्या जवळील काढून घेतलेला ऐवज भुरट्या चोराने जवळील एका कागदात गुंडाळला आणि तो ऐवज असलेल्या कागदाची गुंडाळी करून आपल्या विजारीच्या खिशात ठेवण्याचे नाटक केले. तो ऐवज त्याने हात चलाखी करून स्वताच्या ताब्यात ठेवला. नंतर पुन्हा भेटू असे बोलण्याचे नाटक करून भुरटा इसम भाजी बाजारातून पसार झाला. काही वेळाने राजेंद्र नायर यांनी खिशातील कागदाचा गुंडाळा पाहिला तर त्यात सोन्याचा ऐवज नव्हता. त्यामुळे भुरट्याने तो चोरून नेल्याचा संशय घेऊन राजेंद्र नायर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.