डोंबिवली – आतापर्यंत बाहेरचे चोरटे रात्री, दिवसा घरात कोणी नसताना घरात शिरून चोरी करत होते. घरातील किमती ऐवज चोरून नेत होते. पण, डोंबिवलीत विपरित घडले आहे. घरात वडिलांच्या तिजोरीतील एक लाख ९८ हजार रूपयांची रक्कम घरातील मुलानेच चोरून नेली असल्याची तक्रार वडिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या चोरीच्या प्रकाराने पोलीसही आवाक झाले आहेत.

डोंबिवली पूर्व भागातील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीतील वाल्मिक नगर शेलार नाका भागात हा चोरीचा प्रकार घडला आहे. या चोरी प्रकरणी संदीप जगदीशचंंद झंझोटड (४५) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात स्वताचा सज्ञान २६ वर्षाचा मुलगा विजय संदीप झंझोटड यांच्या विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २०२३ कलम ३०६ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. तक्रारदार संदीप गृहसेवक म्हणून काम करतात.

गुरूवारी सकाळी साडे दहा वाजण्याचा दरम्यान तक्रारदार संदीप यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. तक्रारदार संदीप झंझोटड यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण गुरूवारी सकाळी आपल्या राहत्या घराच्या बाहेर बसलो होतो. घरातील महिला आणि इतर मंडळी कामासाठी बाहेर गेले होते. घरात आपण आणि मुलगा विजय आम्ही दोघेच होतो. घरात कष्ट करून मिळविलेली एक ९८ हजार रूपयांची पैशाची पुंजी मी एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून घरातील शयनगृहातील खाटेतील खणात सुस्थितीत ठेवले होते. पैसे सुरक्षित आहेत ना याची आपण काळजी घेत होतो.

गुरुवारी सकाळी आपण घराच्या बाहेर बसलो होतो. त्यावेळी घरामध्ये आपला मुलगा विजय होता. आपण काही वेळाने उठून घरात गेलो आणि आपणास मुलाच्या वागण्याचा संशय आला म्हणून आपण बिछान्याखालील खाटेतील खण तपासला. तर त्यामध्ये आपली पैशाची पुंजी नव्हती. बाहेर जाताना आपण खणातील पैशाची पुंजी पाहिली होती आणि त्यानंतर काही वेळेत पुंजी गेली कोठे म्हणून आपण घरात शोधाशोध सुरू केली. घरातील सदस्यांना संपर्क करून विचारणा केली. त्यांनी पुंजीला आपण हात लावला नसल्याचे सांगितले.

आपण घरात आहोत. घरात बाहेरून कोणीही चोर चोरीसाठी घुसला नाही. मग घरातील पुंजी गेली कोठे असा प्रश्न वडील संदीप यांना पडला. त्यांनी मुलगा विजयला यासंदर्भात विचारणा केली. पण त्याने आपण पैसे घेतले नसल्याची भूमिका घेतली. विजयनेच पैसे चोरले असल्याचा संशय असल्याने वडिल संदीप यांनी मुलगा विजय विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कष्टाने कमावलेल्या पैशाची मुलानेच चोरी केल्याने कुटुंबीय संतप्त झाले आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.