डोंबिवली – डोंबिवलीत अनेक वर्षांंनी एका ब्राह्मण जोडप्याला मुलगा झाला आहे. या आनंदासाठी तो गरीब गरजू नागरिकांंना एक साडी आणि दोन हजार रूपये वाटप करत आहे, असे एका सफाई कामगार महिलेला दोन भुरट्या चोरांनी सांगितले. या महिलेच्या गळ्यातील, हातामधील एकूण ७० हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज ही महिला गरीब दिसावी म्हणून तो काढण्यास सांगून भुरट्यांनी तो ऐवज चलाखीने स्वताच्या ताब्यात ठेऊन पळून गेले. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.

दिवाळी सणात आपल्या जवळील सोन्याचा ऐवज भुरट्या चोराने चोरून नेल्याने या कष्टकरी सफाई कामगार महिलेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कष्टाने पैसे जमवून या महिलेने सोन्याचा ऐवज घेतला होता. दिवाळी आहे म्हणून या महिलेने हा ऐवज परिधान केला होता. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील गणेश मंदिरा समोरील मसल युनीट जीमसमोर सार्वजनिक रस्त्यावर हा फसवणुकीचा प्रकार सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. संध्या सखाराम गावडे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कष्टकरी महिला आहेत. त्या स्वच्छतेचे काम करतात. संध्या गावडे डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील भोपर कमान भागातील जनाबाई चाळीत राहतात.

संध्या गावडे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मी डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्ता भागातील माझी नियोजित कामे आटोपून सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान पंडित दिनदयाळ रस्त्यावरून पायी रेल्वे स्थानक भागात चालले होते. मी या रस्त्यावरील गणेश मंदिर भागात आल्यावर दोन इसम तेथे मला भेटले. ते माझ्या परिचयाचे आहेत अशा पध्दतीने बोलू लागले. काही क्षण मी त्यांना ओळखत नाही असे सांगितले.

त्यांनी मला आडवे येऊन समोरच्या इमारतीत एक ब्राह्मण राहतो. त्याला अनेक वर्षांनी मुलगा झाला आहे. या आनंदाच्या प्रीत्यर्थ तो ब्राह्मण गरीब, गरजू लोकांना एक साडी आणि दोन हजार रूपये दान करत आहे, असे सांगितले. या महिलेच्या अंगावर सोन्याचे मंगळसूत्र, कानात सोन्याच्या कुड्या आणि पट्ट्या होत्या.

तुमच्या गळ्यातील, कानातील सोन्याचा ऐवज पाहून तुम्ही चांंगल्या घरातील आहे असे पाहून तो ब्राह्मण तुम्हाला दान करणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील कुड्या काढून ठेवा असे बोलून दोघांनी जबरदस्तीने महिलेच्या अंगावरील सोन्याचा ऐवज त्या गरीब दिसाव्यात. ब्राह्मणाने त्यांना दान करावे म्हणून काढून घेतला. तो ऐवज एका कपड्यात गुंडाळून तो महिलेच्या हातात ठेवण्याचे नाटक करून, त्या महिलेला बोलण्यात गुंतवून तिला तुला आता ब्राह्मणाकडून दोन हजार रूपये आणि एक साडी मिळेल असे सांगत काही अंतर चालून गेले आणि काही क्षणात महिलेला काही कळून न देता ते महिलेच्या समोरून वेगाने पळून गेले.

हे दोन्ही भुरटे चोरटे पळून गेल्यावर महिलेला आपले सोन्याचे दागिने लबाडीने हिसकावून नेल्याचे जाणवले. या फसवणूक प्रकरणी महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.