डोंबिवली – डोंबिवली जवळील कल्याण शीळ रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत एक भूमाफिया आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. हे बेकायदा बांधकाम तोडण्यास गेलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभाग तोडकाम पथकाच्या कामात भूमाफिया आणि त्यांच्या साथीदारांनी अडथळे आणले. त्यामुळे एकूण दहा भूमाफियांच्या विरुध्द आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या उपस्थितीत मानपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगरनियोजन (एमआरटीपी) आणि महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाने सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
साजीद हुसैन हे मुख्य बांधकामधारक भूमाफिया आहेत. त्यांच्यासह हसन अशिक हुसैन, हिना बेगम हुसैन, महमद अलिया हुसैन, तहसिम फतिमा हुसैन, शमाबानु अलियार हुसैन, रुक्साना रमजान हुसैन, रमजान आशिक हुसैन, नशीर अलियार हुसैन, जीशान अलियार हुसैन यांच्या विरुध्द हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठांच्या आदेशावरून आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, अधीक्षक विजय रसाळकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे यांच्या उपस्थितीत ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. अधीक्षक रसाळकर यांंनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील माहिती, अशी की मानपाडा पोलीस ठाण्यासमोरील गोळवली गाव हद्दीत भूमाफिया साजिद हुसैन यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोन मजल्याचे बेकायदा बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम स्वताहून काढून टाकण्यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी साजिद यांना नोटीस दिली होती. या बांधकामांवर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कारवाई करण्यात आली होती.
आय प्रभागाचे विद्यमान साहाय्यक आयुक्त भारत पवार यांना गोळवली भागात फिरताना साजीद हुसैन यांनी अद्याप त्यांचे बेकायदा बांधकाम स्वताहून काढून घेतले नसल्याचे आढळले. त्यांनी तातडीने साजिद यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण केली. हे बेकायदा बांधकाम स्वताहून काढून घेण्याची नोटीस दिली. दुसऱ्यांदा नोटीस देऊनही साजिद हुसैन आणि सहकाऱ्यांनी हे बेकायदा बांधकाम हटवले नाही. याऊलट पालिका कर्मचाऱ्यांना याठिकाणी कारवाई करून देण्यास विरोध केला. साहाय्यक आयुक्त पवार यांच्या उपस्थितीत मानपाडा पोलीस ठाण्यात साजिद यांच्यासह आठ जणांंवर सरकारी कामात अडथळा आणि एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आय प्रभाग हद्दीत गेल्या काही महिन्याच्या काळात साहाय्यक आयुक्त पवार यांनी भूमाफियांची बेकायदा चाळी, इमारती, गाळ्यांची बांधकामे भुईसपाट केली आहेत. यापूर्वी या प्रभागात तत्कालीन साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी भूमाफियांच्या बांधकामांच्या विरुध्द मोहीम उघडली होती. आय प्रभागात सतत बेकायदा बांधकामांच्या विरुध्द पालिकेच्या कारवाया सुरू असल्याने भूमाफियांजवळ चलन नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत.
आय प्रभागात एकही बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी घेत आहोत. पाऊस सुरू असला तरी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत. गोळवलीतील बांधकामधारकांच्या विरुध्द एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे. हे बांधकाम पोलीस बंदोबस्त मिळाली की भुईसपाट करू. – भारत पवार (साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग.)