लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यातील मृतांच्या आठवणी कायमस्वरुपी डोंबिवलीतील नागरिकांच्या मनात राहाव्यात. यासाठी दहशतवादी हल्ल्यातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या स्मृती जपण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात एक स्मृतिस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी डोंबिवलीचे स्थानिक आमदार आणि भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
या कामासाठी आपल्याकडे सुमारे एक कोटी २५ लाखाचा निधी उपलब्ध आहे. आपण या स्मृतिस्थळा संदर्भातच्या आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी आयुक्तांकडे केले आहे. पहलगाम येथील हल्ल्यात देशाच्या विविध भागातील सुमारे २६ पर्यटक मारले गेले. मानवतेला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. मुलांच्या परीक्षा संपल्या, शाळांना सुट्ट्या लागल्या म्हणून डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने जम्मू काश्मीर येथे कुटुंबीयांसह पर्यटनासाठी गेले होते. तेथे कुटुंबीयांसमोर दहशतवाद्यांनी त्यांना ठार मारले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटना आहेत.
प्राण गमावलेल्या लेले, जोशी आणि मोने कुटुंबीयांशी डोंबिवलीतील नागरिकांचे भावनिक बंध आहेत. देशासाठीच या तिन्ही पर्यटकांनी बलिदान केले, अशी लोकभावना झाली आहे. या तिन्ही पर्यटकांचे पार्थिव डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. दहशतवादाविषयी नागरिकांच्या मनात असलेला रोष लोकांनी या गर्दीच्या माध्यमातून ) व्यक्त केला. या गर्दीतील प्रत्येक नागरिकाचा मान राखण्यासाठी भागशाळा मैदान येथे या तिन्ही मृत पर्यटकांचे स्मृतिस्थळ होणे खूप गरजेचे आहे. यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने विनाविलंब भागशाळा मैदानात स्मृतिस्थळ उभारणीसाठीच्या आवश्यक प्रक्रिया सुरू करून त्या मंजूर कराव्यात. या कामासाठी आपल्याकडे असलेला सुमारे सव्वा कोटीचा निधी या कामासाठी वापरावा, असे आमदार चव्हाण यांनी पालिका प्रशासनाला सूचित केले आहे.
डोंबिवलीकर निवासी कॅप्टन विनयकुमार सचान हे उमदे लष्करी अधिकारी काही वर्षापूर्वी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृति कायमस्वरुपी डोंबिवलीकरांच्या स्मरणात राहण्यासाठी डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना याठिकाणी अभिवादन केले जाते. सचान कुटुंबीयांसह डोंबिवलीतील नागरिक, शाळकरी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात.