डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावर सोनारापाडा भागात डोंंबिवली नागरी सहकारी बँक मुख्यालय इमारती समोरील भागात रविवारी रात्री मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना, अचानक मेट्रो मार्गिकेच्या एका खांबामधील लोखंडी सळ्या एका दिशेने झुकल्या. हा प्रकार मेट्रो कामगारांच्या निदर्शनास येताच, काही वेळ या भागातील वाहतूक मेट्रो ठेकेदाराच्या सूचनेप्रमाणे रोखून धरण्यात आली. अत्याधुनिक सामग्रीच्या साहाय्याने वाकलेला लोखंडी सळ्यांचा खांब रात्रीच पुन्हा सरळ करण्यात आला.
कल्याण शिळफाटा रस्त्यावर गेल्या दीड वर्षापासून कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गासाठी मार्गिका उभारणीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. काटई ते सोनारपाडा, गोळवली, कल्याणमध्ये बैलबाजार ते शिवाजी चौक दरम्यान ही कामे सुरू आहेत. रविवारी रात्री कल्याण शिळफाटा रस्त्यावर सोनारपाडा हद्दीत डोंबिवली नागरी सहकारी बँक मुख्यालय इमारती समोरील गेल्या आठवडाभरात मेट्रो मार्गिकेसाठी रस्त्याच्या मध्यभागी उभ्या केलेल्या एका सिमेंट खांबातील १५ ते २० फूट उंचीवरील सळ्या रस्त्याच्या पश्चिम बाजुला झुकत असल्याचे मेट्रो मार्गिका कामगारांच्या निदर्शनास आले. झुकण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू होती. १४५ क्रमांकाचा हा खांब आहे.
मेट्रोच्या आधार खांबातील लोखंडी सळया एका बाजुला झुकत असल्याचे समजताच तात्काळ घटनास्थळी उपस्थित असलेले मेट्रो कंपनीचे ठेकेदार, अभियंते घटनास्थळी आले. बाजुलाच मेट्रोचे खांब उभारणारी अवजड यंत्र सामुग्री होती. पायाभरणी पासून भक्कम आणि मजबुतीने सिमेंट खांब उभारणीचे काम सुरू असल्याने खांबातील लोखंडी सळ्या कोसळणार नाहीत याची पूर्ण खात्री अभियंत्यांना होती. तरीही कोणताही धोका नको म्हणून कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनारपाडा भागातील लोखंडी सळया झुकलेल्या भागातील वाहतूक काही वेळ वाहतूक पोलिसांनी बंद ठेवली.
अवजड क्रेनच्या साहाय्याने मेट्रो मार्गिकेचे अभियंते आणि कामगार यांनी झुकलेल्या सळयांना गोलाकार पध्दतीने लोखंडी दोर लावून हळूहळू एका बाजुला खेचण्यात यश मिळविले. अर्धा ते एक तास या झुकलेल्या सळया सरळ करण्याचे काम सुरू होते. मुसळधार पावसात गेल्या पाच महिन्यात ही कामे करण्यात आली आहेत. एकाही खांबाला झुकणे नाहीच पण चीरही पडलेली नाही, असे एका अभियंत्याने सांगितले. काही वेळा प्रमाणापेक्षा अधिकचा भार आला की असा प्रकार घडतो. त्यात आव्हानात्मक आणि धोकादायक असे काही नसते, असे या कामाच्या ठिकाणचा अभियंता म्हणाला.
मेट्रो मार्गातील लोखंडी सळ्यांचा झुकलेला भाग सुस्थितीत केल्यावर वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक पूर्ववत केली.