डोंबिवली : मागील काही महिन्यांपासून डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर, सुदर्शनगर, निवासी वस्ती भागात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. दिवसा, रात्री हे गर्दुल्ले अर्धनग्न, नग्न अवस्थेत रस्त्यांवर फिरत असतात. लहर आली की हे गर्दुल्ले रस्त्य्यांवर उभ्या असलेल्या, सोसायटी आवारात घुसून तेथील दगड, धारदार वस्तूने वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकार करत आहेत. सोमवारी दुपारी मिलापनगर भागात एका गर्दुल्ल्याने सहा मोटारींच्या काचा फोडल्या आहेत.
डोंबिवली एमआयडीसीतील बहुतांशी रहिवासी नोकरदार, व्यावसायिक आहे. सकाळच्या वेळेत घरातील नोकरदार मंडळी कामावर गेली की घरांमध्ये वृध्द मंडळी, लहान बालके, त्यांना सांभाळणारे काळजी वाहक असतात. या नोकरदारांची वाहने सोसायटी, बंगल्यांच्या आवारात उभी असतात. गेल्या काही दिवसांपासून गर्दुल्ले आक्रमक होत सोसायटी, बंगले परिसरात घुसून तेथे उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून पळून जात आहेत. घर परिसरातील सीसीटीव्हींमध्ये हे प्रकार कैद होत आहेत.
हे गर्दुल्ले अचानक उघड्या घरात घुसले तर घरातील ज्येष्ठ, वृध्द मंडळींच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. मिलापनगर भागात सोमवारी नग्न अवस्थेत असलेल्या एका गर्दुल्ल्याने दोन तास धुमाकूळ घातला. या गर्दुल्ल्याने मिलापनगरमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या, सोसायटीच्या आवारांमध्ये घुसून तेथील वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये माल वाहतूकदार व्यावसायिक संदेश प्रभुदेसाई यांच्या महागड्या बीएमडब्ल्यु वाहनाची काच गर्दुल्ल्याने फोडली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. एका रिक्षा चालकाच्या अंगावर धावत जाऊन गर्दुल्ल्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. सावध असलेल्या रिक्षा चालकाने वेळीच पळ काढल्याने तो बचावला.
मिलापनगर भागातील रहिवाशांना आपल्या वाहनांच्या काचा फोडल्याचे लक्षात आल्यावर काही जागरूक रहिवाशांनी मानपाडा पोलिसांना संपर्क केला. दोन पोलीस हातात लाठ्या घेऊन आले. परंतु, गर्दुल्ल्याच्या हातात शस्त्र असल्याने आणि तो बेभान झाला असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याला सहज पकडणे शक्य नाही. हे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी पोलीस ठाण्यातून पिंजरा वाहन आणि अधिकचे पोलीस बळ मागवून घेतले. त्यानंतर मोठ्या शिताफिने पोलिसांनी सापळा लावून बेभान झालेल्या गर्दुल्ल्याला ताब्यात घेतले.
हातात चाकू घेऊन गर्दुल्ला मिलापनगर भागात फिरत होता. एमआयडीसी परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आहेत. या भागात विद्यार्थी, महिला पालक, रुग्ण नातेवाईक यांची वर्दळ असते. त्यांनाही या गर्दुल्ल्यांच्या उपद्रवाला तोंड द्यावे लागते. एमआयडीसी परिसरात वाढलेल्या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी एमआयडीसी परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अशाच पध्दतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचा काचा अज्ञाताने फोडल्या होत्या. कल्याण, डोंबिवली इतर रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्य करून असलेल्या गर्दुल्ले, मद्यपी यांच्यावर रेल्वे सुरक्षा बळाचे जवान यांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. दिवस, रात्र एकही गर्दुल्ला रेल्वे स्थानक भागात दिसणार नाही असे नियोजन रेल्वे पोलिसांनी केले आहे. त्यामुळे हे गर्दुल्ले शहरांच्या विविध भागात फिरत असल्याचे समजते.