डोंबिवली – डोंबिवलीतील उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवरील एका तरूणा बरोबरची मैत्री चांगलीच महागात पडली. या तरूणाने तरूणीच्या इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवरील अर्धनग्न प्रतिमा तिच्या वडील, आईंना पाठवून दिल्या. आणि हे थांबवायचे असेल तर पैसे देण्याची मागणी केली. याप्रकरणी बदनामी टाळण्यासाठी तरूणीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात चिराग गवांडे (२२) या तरूणा विरूध्द तक्रार केली आहे.
मानपाडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि धमकी देणे कायद्याने चिराग विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीतील माहिती अशी, की अल्पवयीन मुलगी डोंबिवलीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेते. तिचे वडील नोकरीनिमित्त दक्षिण आफ्रिकेत आहेत. आफ्रिकेचा भाग दुर्गम असल्याने तेथून घरातील कुटुंबीयांशी सहज संपर्क साधता यावा. म्हणून वडिलांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा एक मोबाईल आपल्या मुलीला घेऊन दिला होता. या मोबाईलवर मुलीने चॅटिंग उपयोजना स्थापित केले होते.
एक दिवस मुलीच्या आईने आपल्या मुलीचा मोबाईल तपासला. त्यावेळी तिला नवीन उपयोजन मुलीने स्थापित केले असल्याचे समजले. तिने याविषयी विचारणा केली आणि ते चॅटिंग उपयोजना उडून टाकण्यास मुलीला सांगितले. तिने ते मोबाईल मधून उडविले नाही. दरम्यानच्या काळात या मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चिराग गवांडे या तरूणा बरोबर ओळख झाली. चिरागने या मुलीचा विश्वास संपादन केला. या मुलीकडून सहज संपर्कातून चिरागने मुलीचा इन्स्टाग्राम ओळखपत्र क्रमांक आणि गुप्त संकेतांक मागवून घेतला. तो काही त्याचा गैरवापर करेल असे पीडित मुलीला वाटले नाही.
मुलीचा इन्स्टाग्राम ओळखपत्र क्रमांक आणि संकेतांक मिळाल्यानंतर चिराग गवांडे याने मुलीकडे तिचे अर्धनग्न प्रतिमा मागण्यास सुरूवात केली. पण त्यास तिने नकार दिला. पण तु नाही दिले तर तुझ्या इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट खात्यावरून काढून घेऊन ते मी प्रसारित करीन अशी धमकी चिराग पीडित तरूणीला देऊ लागला. आपली नाहक बदनामी होईल या भीतीने पीडितेने आपल्या अर्धनग्न प्रतिमा चिरागला पाठविल्या. चिरागने त्याचा दुरुपयोग करत त्या प्रतिमा पीडित मुलीच्या वडिलांना दक्षिणे आफ्रिकेत पाठविल्या. आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आपल्या मुलीच्या धक्कादायक प्रतिमा पाहून वडील अस्वस्थ झाले. त्यांनी डोंबिवलीत घरी फोन केला आणि याबाबत माहिती घेतली. त्यावेळी घडलेला प्रकार पीडितेने वडिलांना सांगितला.
त्यानंतर मुलीच्या आईने आपले इन्स्टाग्राम खाते तपासले. त्यावेळी तिच्याही खात्यावर मुलीच्या नग्न अवस्थेमधील प्रतिमा आल्या होत्या. मुलीच्या प्रतिमा पाहून पालक अस्वस्थ झाले. चिरागने त्यानंतर मुलीच्या वडिलांना संपर्क केला आणि ‘तुमच्या मुलीच्या अर्धनग्न प्रतिमा माझ्याकडे आहेत. आता आपण व्यवहारासंदर्भात बोलू या,’ असे सांगत पैशांची मागणी केली. हे ऐकून मुलीचे वडील घाबरले आणि त्यांनी चिरागचा फोन बंद केला. चिराग आपल्या मुलीच्या प्रतिमा नातेवाईक आणि इतरांना पाठवून नाहक बदनामी करील म्हणून कुटुंबीयांनी अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी चिराग विरुध्द तक्रार दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.