डोंबिवली : क्रिकेट खेळामध्ये भारत पाकिस्तान देशाचे राजकीय द्वंद आणू नये असे वाटत होते. पण पाकिस्तान त्या पात्रतेचा देश नाही. पाकिस्तानवर खेळ आणि इतर किरकोळ विषयांवरून बहिष्कार टाकून काहीही उपयोग नाही. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर त्या देशावर भारताने पूर्ण बहिष्कारच टाकला पाहिजे. कारण तो न सुधारण्या यादीतील देश आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील संजय लेले यांचा मुलगा हर्ष लेले यांनी रविवारी माध्यमांना दिली.

मनसेचे कल्याण ग्रामीणचे नेते राजू पाटील यांनी भारत पाकिस्तान सामन्याचा निषेध व्यक्त करत समाज माध्यमांवर एक भावनिक मजकूर प्रसारित केला आहे. या मजकुरात राजू पाटील यांनी पहलगाम बैसरन टेकडी येथे एक नुकतेच विवाह झालेले दाम्पत्य पर्यटनासाठी गेले होते. तेथे या नवविवाहितेचा पती दहशतवाद्यांनी भ्याड हल्ल्यात मारला. त्यावेळी निशब्द झालेली नवविवाहिता आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ बसून आहे. या निशब्दतेमधून त्या महिलेच्या व्यक्त झालेल्या उद्वेगाच्या भावना राजू पाटील यांनी समाज माध्यमात त्या महिलेच्या प्रतिमेसह प्रसारित केल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यात अनेक माता भगिनींचे कुंकू पुसले गेले. त्या हल्ल्याच्या जखमा अद्याप भळभळत आहेत. अनेक कुटुंबे या दहशतवाद्यांनी पोरकी केली. ज्या मुला, मुली, माता, भगिनींनी आपल्या कुटुंब प्रमुखाला आपल्या समोर दहशतवाद्यांनी मारल्याचे पाहिले. त्यांच्या अश्रुंची हीच किंमत आहे का. एकीकडे पाकिस्तानचे पाणी अडवायचे आणि दुसऱ्या बाजुने त्यांच्या बाजुने व्यवहारी सामना खेळायचा. ही कुठली नीती आणि न्याय. हा सामना म्हणजे संपूर्ण भारतीयांचा अनादर आहे. देशभक्त नागरिक म्हणून या सामन्याचा निषेध करतो आणि तमाम नागरिकांनी हा सामना पाहू नये असे तमाम नागरिकांना आवाहन करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तान क्रिकेट सामान्याच्या विरूध्द रविवार सकाळी डोंबिवली, कल्याणमध्ये मनसे, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलन करून या सामन्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तान, दहशतवादाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. डोंबिवली, कल्याणमधील अनेक जागरूक नागरिकांनी पहलगाम बैसरण टेकड्या येथे भारताच्या विविध भागातील निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून ठार मारले. त्याचा निषेध म्हणून आजचा भारत पाकिस्तान सामना न पाहण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला आहे.

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीत हेमंत जोशी, हेमंत मोने, संजय लेले हे तीन पर्यटक मारले गेले. या कुटुंबातील संजय लेले यांचा मुलगा हर्ष यांनी माध्यमांना सांगितले, खेळात भारत पाकिस्तान विषय आणू नये असे वाटत होते. पण पाकिस्तान त्या पात्रतेचा देश नाही. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकल्या शिवाय तो देश सुधारणार नाही. शिखर धवन, हरभजन सिंग या क्रिकेटपटुंनी भारत क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. अशी कृती प्रत्येक स्पर्धा, अशिया कप आणि इतर स्पर्धांमध्ये प्रत्येक स्पर्धक, क्रिकेटपटुने घेणे आवश्यक आहे, असे हर्ष लेले यांनी सांगितले.