डोंबिवली नागरी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह फेडरेशनचा ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पाच हजार कोटी पर्यंतच्या ठेवींचा टप्पा गाठण्यात बँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या ठेवींच्या गटातून डोंबिवली नागरी सहकारी बँक या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ सनदी लेखापाल अजयकुमार ब्रम्हेचा यांच्या हस्ते डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे (डीएनएस) अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर, सरव्यवस्थापक रमेश सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी फेडरेशनच्या उपाध्यक्षा ज्योती कवाडे, संचालिका शशिताई अहिरे, बँकेचे संचालक सत्यनारायण लोहिया, जयंत पित्रे, मिलिंद आरोलकर उपस्थित होते.

हेही वाचा >>> भिवंडी सर्वाधिक कोंडीचे शहर; जगातील संथगती शहरांच्या यादीत भिवंडी पाचव्या क्रमांकावर

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या राज्याच्या विविध भागात ६४ शाखा आहेत. मार्च २०२३ अखेरपर्यंत बँकेच्या एकूण ठेवी तीन हजार ७५६ कोटी आहेत. कर्ज व्यवहार दोन हजार ७६ कोटीपर्यंत आहे. २०२२-२०२३ आर्थिक वर्षात बँकेला ११७ कोटी २३ लाखाचा ढोबळ नफा झाला. सर्व प्रकारचा खर्च वजा करता बँकेला २२ कोटी ७२ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.

हेही वाचा >>> डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेच्या हालचाली; पालिकेची संबंधित ठेकेदाराला नोटीस

ग्राहकसेवेच्या विविध प्रकारच्या योजना, उपयोजन सुविधा बँकेने ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्राहकांच्या हिताचा विचार करुन बँक नेहमीच किफायतशीर कर्ज योजना, व्याजदराच्या ठेवी योजना जाहीर करते. सणांचे औचित्य साधून बँकेने नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. यामुळे ग्राहकांना वाहनांच्या कर्जावर १०० टक्के कर्ज उपलब्ध होणार आहे. केंद्र, राज्य सरकारच्या पर्यावरण संवर्धन, प्रदूषण मुक्त शहरांच्या योजनांचा विचार करुन विद्युत वाहन खरेदीसाठी बँक १०० टक्के वाहन कर्ज ग्राहकांना उपलब्ध करुन देणार आहे. बँकेने आता वक्रतुंड ठेव योजना जाहीर केली आहे. २१ महिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांना ७.८० टक्के, सर्वसाधारण नागरिकांना ७.३० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील वित्तीय संस्थांनी बँक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. बँकेचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी यांनी गट समुहाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा हा पुरस्कार म्हणजे पावती आहे, असे अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर यांनी सांगितले.