डोंबिवली – आपल्या मित्र-आप्तेष्टांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीतील बापूसाहेब फडके रस्ता सोमवारी तरूणाईने गजबजून गेला होता. उत्साह, आनंद आणि जल्लोष पहाटेपासून फडके रस्त्यावर ओसंडून वाहत होता. विविध प्रकारची वेशभूषा, केशभूषा, दागदागिने, आभूषणे परिधान करून बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिक, तरूणी, महिला या उत्साही, आनंदी वातावरणात सहभागी झाले होते. राजकीय नेते, कलाकार आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिरात दर्शनासाठी येण्याची डोंबिवलीतील नागरिकांची मागील सुमारे सत्तर ते ऐशी वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला एक वेगळे रूप द्यावे, दिवाळीनिमित्त फडके रस्त्यावर एकत्र येणाऱ्या तरूणाईला संघटित करावे. त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्यासाठी काही सामाजिक उपक्रम राबावेत. यासाठी श्री गणेश मंदिर संस्थानने तीस वर्षापूर्वी युवा भक्ती शक्ती दिन साजरा करण्याची प्रथा सुरू केली. तीच परंपरा अखंडपणे नव्या जोमाने जपली जात आहे.
चैत्र पाडव्याच्या स्वागत यात्रेनंतर दिवाळीत फडके रस्त्यावर तरूणांसह नागरिकांचा जल्लोष असतो. सोमवारी अभ्यंगस्नान दिवाळीचा पहिला दिवस असल्याने डोंबिवली शहरासह शिळफाटा पलावा, २७ गाव, मलंगगड, कल्याण परिसरातून तरूण, तरूणी दिवाळीनिमित्त शुभेच्छा आणि भेटीगाठींसाठी फडके रस्त्यावर आले होते. फडके रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आले होते. सेल्फी काढण्यासाठी बालगोपाळांसह तरूणाई, ज्येष्ठांची झुंबड होती. नृत्यगंध कार्यक्रमातील कलाकार उपस्थितांचे विविध गाण्यांच्या तालावर मनोरंजन करत होते. अमळनेर येथून आलेल्या डाॅ. अक्षय कुळकर्णी यांनी शंख वादनाचा कार्यक्रम सादर केला. शंखातील एका लयीतील हाळी ३० सेकंद फुंकता येते हे डाॅ. कुळकर्णी यांनी शंख फुकीतून दाखविले. विविध लय, सुरावटीतील शंख वादनाने नागरिक मंत्रमुग्ध झाले.
बाजीप्रभू चौक ते आप्पा दातार चौक हा फडके रस्त्याचा ३०० मीटरचा विविध पेहरावातील तरूणाईने गजबजून गेला होता. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांची कार्यक्रमात उपस्थिती होती. राष्ट्रभक्तीचे प्रेम तरूणांमध्ये जागृत व्हावे म्हणून यावेळी व्यासपीठावर पोलीस बॅन्डचे वादन करण्यात आले. हजोरांच्या संख्येने एकावेळी नागरिक फडके रस्त्यावर शांततेत एकत्र येऊन एकत्रित कार्यक्रम सादर करतात, याबद्दल उपायुक्त झेंडे यांनी समाधान व्यक्त केले. या संघटितपणाचा राष्ट्रासाठी उपयोग झाला पाहिजे, असे मत झेंडे यांनी व्यक्त केले.
झी टीव्ही चित्रमालिकेतील कमळी मालिकेतील ‘कमळी’ फडके रस्त्यावर आपल्या मालिकेतील चमूसह आली होती. कलाकार कमळी बरोबर सेल्फी काढण्यासाठी तरूण, तरूणींची झुंबड उडाली होती. तरूण, तरूणींचे गट सेल्फी, एकमेकांचे मोबाईलमधून छायाचित्र काढण्यात मग्न होते. काही जण आपले नवीन कोरे महागडे मोबाईल, नवीन वाहने आपल्या मित्रमैत्रिणींना दाखविण्यासाठी घेऊन आले होते.
उन्हाचा चटका वाढला तशी तरूणाई मग फडके रस्ता भागातील हाॅटेल्स, वडापाव, चहाच्या ठेल्यांकडे वळली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी गणपती मंदिरात गणेशाचे दर्शन घेतले.
ढोल वादन त्रस्त
टिळक रस्त्यावर आठ ते दहा ढोल वादन पथके वादन करत होती. या कानठळ्या बसविणाऱ्या वादनाने परिसरातील नागरिक खूप त्रस्त आहेत. मागील वर्षापासून स्थानिक रहिवासी या ढोल वादनाविषयी तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. घरात लहान बाळे, रुग्ण आहेत. त्यांना या वादनाचा प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ही पथके नेहरू मैदान, भागशाळा, रेल्वे मैदानात उभी करून तेथे वादन करावे, अशा नागरिकांच्या सूचना आहेत.