डोंबिवली – भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव काळात घरोघरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि अनेक संस्थांकडून गणेशोतत्सव साजरा केला जातो. गणपतींची वाढती संख्या आणि त्याप्रमाणात पुरोहितांचे प्रमाण कमी असल्याने मनात असुनही गणेशभक्तांना पुरोहिताच्या उपस्थितीत गणपतीची प्राणप्रतिष्ठेची पूजा करून घेणे शक्य होत नाही. गणेश भक्तांची ही अडचण विचारात घेऊन डोंबिवलीतील ज्येष्ठ पुरोहित प्रदीप जोशी (गुरूजी) यांनी धर्मपक्ष युट्युब वाहिनीच्या माध्यमातून गणेशभक्तांना बुधवारी सकाळी साडे दहा वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठेची पूजा सांगण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश भक्तांनी प्रदीप जोशी गुरूजींच्या धर्मपक्ष युट्युब, फेसबुक थेट प्रक्षेपणात बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजता सहभागी व्हावे. पुजेची सर्व तयारी करून ठेवावी. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता प्रदीप जोशी गुरूजी गणपतीची प्राणप्रतिष्ठेची पूजा यथासांगपणे सांगणार आहेत. पूजा सुरू असताना कोणीही गणेशभक्ताने कोणत्याही प्रकारची शंका विचारू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. घरबसल्या गणेशभक्तांना मनोभावे पुरोहिताच्या हातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेण्याची संधी प्रदीप जोशी गुरूजी यांनी उपलब्ध करून दिली आहे. गणेश भक्तांना या ऑनलाईन पुजेसंदर्भात, पुजेविषयी काही शंका असल्यास त्यांनी आदल्या दिवशी गुरूजींकडे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून विचारणा करावी, असे आवाहन गुरूजींनी केले आहे.

प्राणप्रतिष्ठेची ही पुजा मोफत सांगितली जाणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कोणा गणेशभक्ताला पुजेनंतर स्वेच्छेने दक्षिणा द्यावयाची इच्छा असल्यास ते थेट गुरूंजींशी संपर्क साधू शकतात. दक्षिणा देण्यासंदर्भात कोणाही भाविकावर सक्ती नाही, असे जोशी गुरूजी यांनी स्पष्ट केले आहे. पुजेला ऑनलाईन माध्यमातून सुरूवात होण्यापूर्वी गणेश भक्तांनी मूर्ती मखरात ठेवावी. पुजेची आवश्यक सर्व तयारी पुजेपूर्वी करून ठेवावी म्हणजे पुजा सुरू झाल्यावर यजमानाला धावपळ करावी लागणार नाही. पुजा सावकाश, यथासांग सांगितली जाईल. त्यामुळे गणेश भक्तांनी गडबडून जाऊ नये, असे जोशी गुरूजी यांनी स्पष्ट केले आहे.

प्राणप्रतिष्ठेसाठी गणपती मूर्तीवर सोळा उपचार केले जातात. ते सर्व साहित्य पुजेच्या ठिकाणी तयार ठेवावे. गणपती पुजेविषयी काही शंका असल्यास त्यांनी गणपती प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिवसभरात ९८२०८७२२९४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे जोशी गुरूजींनी जाहीर केले आहे.

करोना महासाथीच्या काळात घराबाहेर पडण्याची सोय नव्हती. या कालावधीत गुरूजी घरी गणपती बसविण्यासाठी येणार नसल्याने अनेक गणेश भक्तांची अडचण झाली होती. त्यावेळी जोशी गुरूजींनी गणेश भक्तांची अडचण विचारात घेतली. करोना महासाथ काळपासून गणपती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी गुरुजींनी गणेश भक्तांना ऑनलाईन माध्यमातून प्राणप्रतिष्ठेची पूजा सांगण्यास सुरूवात केली. मागील चार वर्षापासून वर्षापासून गुरूजींचा हा शिरस्ता सुरू आहे.