डोंबिवली – डोंबिवली पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक भागात भाजप आमदार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निधीतून डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणाचा उपक्रम गेल्या दीड वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आला. या सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरणातील एकूण २४ मीटरचा भाग रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामात अडथळा येत असल्याने या सुशोभीकरणातील दोन्ही बाजुचा एकूण २४ मीटरचा भाग तात्पुरता काढण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाच दरम्यानचे पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निधीतून करण्यात आलेले सौंदर्यीकरणाचे काम पुन्हा रेल्वेकडून पू्र्ववत करून देण्याची अट पालिकेने केलेल्या प्रस्तावात समाविष्ट केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रवासी हिताच्या या कामासाठी सौंदर्यीकरणाचा भाग तात्पुरता स्वरुपात हटविण्यास मुभा दिली आहे.

साहित्यिक, सांस्कृतिक नगरीचे प्रवेशव्दार म्हणून तीन वर्षापूर्वी डोंबिवली पूर्व पश्चिम रेल्वे स्थानकाचा भाग साहित्यिक, सांस्कृतिक डोंबिवली हा विषय घेऊन सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या कामासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शासकीय निधी पालिकेला उपलब्ध करून दिला. या सुशोभिकरणामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाचे पूर्व आणि पश्चिम भाग साहित्यिक सांस्कृतिक डोंबिवलीचे नियमित नागरिकांना दर्शन घडविते. गेल्या दीड वर्षापासून डोंबिवली रेल्वे स्थानकात मध्यभागी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाच दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम सुरू आहे.

या पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे. या पुलाच्या मार्गातील रेल्वे स्थानकातील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. आता पुलाच्या आधार खांबांसाठी पायाभरणीची कामे करणे, आधार खांबांवर तुळया ठेवणे, अवजड साहित्य रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळेत नेणे, तुळया उचलण्यासाठीची अवजड यंत्रणा डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे स्थानका जवळ तैनात केली जाणार आहे.

या कामामध्ये सुशोभिकरणाच्या कामाचा काही अडथळा येत होता. हा अडथळा दूर केल्या शिवाय रेल्वेला काम करता येणार नाही. त्यामुळे पालिकेने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला. डोंबिवली पश्चिमेतील चार मीटर आणि पूर्व भागातील वीस मीटर इतका सौंदर्यीकरणाचा भाग काढून टाकण्याचा प्रस्ताव पालिकेच्या डोंबिवली बांधकाम विभागाने तयार केला. हा प्रस्ताव आयुक्तांकडून मंजूर करून घेण्यात आला. रेल्वेकडून पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुशोभिकरणाचे काम पूर्ववत करून देण्याच्या अटीवर सौंदर्यीकरणाचा भाग काढून टाकण्यासाठी रेल्वेला परवानगी देण्याचा हा प्रस्ताव आयुक्त अभिनव गोयल यांनी तात्काळ मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे अंतीम मंजुरीसाठी जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीचा हा पादचारी पूल आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालिकेने या कामात रेल्वेला पूर्ण सहकार्य देण्याची तयारी केली आहे.