डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत भरत भोईर नगरमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग कार्यालया समोरील परिसरात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता एका चाळीतील घर मुसळधार पावसामुळे कोसळले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन बचावकार्य केले.

भरत भोईर नगरमध्ये माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या जुन्या घराशेजारील राजधानी अपार्टमेंट भागात नागू बाळू म्हात्रे चाळ आहे. या चाळीत संजय तायडे हे रिक्षा चालक आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चाळीच्या छतावर लोखंडी ॲन्गल आणि पत्रे आहेत. मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मे महिन्यात घराच्या छताची रिक्षा चालक तायडे यांनी पावसाचे पाणी छतावरून घरात येऊ नये म्हणूुन डागडुजी केली होती.

शुक्रवारी रात्री तायडे कुटुंबीयांचे भोजन झाल्यावर काही जण दूरचित्रवाणी पाहत होते. झोपण्याची तयारी सुरू असताना अचान छताच्या दिशेने काहीतरी मोडल्याचा मोठा आवाज झाला. म्हणून तायडे कुटुंबीय तात्काळ घराबाहेर आले.

त्यानंतर काही क्षणात लोखंडी ॲन्गलसह छतावरील पत्रे कोसळले. पोटमाळा असल्याने थेट पत्रे घरातील ओट्यावर पडले नाहीत. अन्यथा मोठी हानी झाली असती. पत्रे कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. नागू म्हात्रे चाळीसह परिसरातील रहिवासी घराबाहेर पडले. छतासह पोटमाळ्याचा भाग घर आणि बाहेरील भागात कोसळला. त्यामुळे घरातील स्वयंपाक घरासह इतर सामानाची नासधूस झाली. त्यात पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यामुळे घरात चिखल झाला.

पालिकेच्या गरीबाचावाडा येथील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी बचावकार्य सुरू करून घरातील पत्रे, लोखंडी ॲन्गलची अडगळ बाहेर काढली. इतर नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला. या भागातील सामाजिक कार्यकर्ते या भागात आले होते. त्यांनी बचावासाठी सहकार्य केले.

स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना त्यांचे कार्यकर्ते प्रशांत पटेकर, मनोज वैद्य यांनी ही माहिती दिली. त्यानंतर बाधित कुटुंबीयांसाठी आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना केल्या. तायडे कुटुंबीय आता आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास गेले आहे. छताच्या पत्र्याखालील लोखंडी ॲन्गलचा भिंतीमधील काही भाग गंजला असल्याने आणि पावसाचा पत्र्यावरील भार वाढला असल्याने ही घटना घडली असल्याची चर्चा या भागात आहे.