“ठाणे जिल्ह्यातील सर्वच पालिका हद्दींमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्ते सुस्थितीत ठेवणे ही प्रत्येक पालिका प्रशासनाची जबाबादारी आहे. या जबाबदारीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो. पालिकांमध्ये वर्षानुवर्ष सत्ता उपभोगणारे सत्ताधारी हेच खड्ड्यांना जबाबदार आहेत.” अशी टिका मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी येथे केली.

मनसे युवा नेते अमित ठाकरे शनिवारी कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. या भागातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या. बैठकांनंतर अमित यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वेश सभागृहात आयोजित कार्यक्रमात आमदार प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील, युवा शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे, दीपाली पेडणेकर, रमा म्हात्रे, अवि वालेकर, गणेश कदम उपस्थित होते.

“मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, दिवा भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिका हद्दींमधील खड्ड्यांची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. वेळीच रस्ते सुस्थितत ठेवणे, त्यांची डागडुजीची कामे झाली पाहिजेत. ती वेळेवर केली जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. या खड्डे समस्येला वर्षानुवर्ष पालिकांमध्ये सत्ता उपभोगणारे सत्ताधारी जबाबदार आहेत.” अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.

त्यामुळे लोकल प्रवास बरा वाटतो –

“लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गर्दीमुळे हाल होत आहेत. याचा अनुभव मी नेहमी घेत असतो. खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीत अडथळे येतात. त्यामुळे लोकल प्रवास बरा वाटतो.”, असे अमित यांनी सांगितले. तसेच, “आमची सत्ता आली तर ती जनतेच्या सेवेसाठी असेल.” अशी पुष्टी त्यांनी खड्डे विषयावर बोलताना जोडली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिबू शेख, शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रवीण केणे यांनी मनसेत प्रवेश केला. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

त्यामुळे लवकरच मनसेला अच्छे दिन येतील –

“प्रत्येक पक्षाला चांगले वाईट दिवस असतात. मागे साडेसाती लागलेली असते. अनेक वर्ष विरोधी पक्षात असणारा भाजपा २०१४ मध्ये चांगले बहुमत मिळवून केंद्रात सत्तास्थानी आला. प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळत असते. मनसेची साडेसाती आता संपली आहे. तरुण वर्ग अधिक संख्येने मनसेकडे वळला आहे. मनसेचे कार्यकर्ते थेट जनतेच्या संपर्कात आहेत. त्यांच्या अडचणी सोडविल्या जात आहेत. नागरी समस्यांची सोडवणूक केली जात आहे. त्यामुळे लवकरच मनसेला अच्छे दिन येतील.”, असे अमित ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी शाळेचा टक्का कोणत्याही परिस्थितीत घसरू दिला जाणार नाही-

“मराठी शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या हा चिंतेचा विषय असला तरी मराठी शाळेचा टक्का कोणत्याही परिस्थितीत घसरू दिला जाणार नाही. यासाठी शहर, गाव, शासन पातळीवर सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी केले अशा फक्त शासन स्तरावरून घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कायम आहे. ते कमी करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करू. विद्यार्थ्यांच्या पाठीशी मनसे ठाम आहे.”, असे युवा नेते अमित ठाकरे यांनी सांगितले.