डोंबिवली : डोंबिवलीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ दिवंगत सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीने आयोजित केलेल्या टॅलेन्ट हंट स्पर्धेत डोंंबिवली शहर परिसरातील ७० शाळांमधील ४१ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल आणि पलावा भागातील पवार पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

डोंबिवली टॅलेंट हंट स्पर्धेचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. या वर्षी सुमारे ४१,००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८वी ते १०वी अशा दोन गटातील २५-२५ स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. वक्तृव, वैयक्तिक मुलाखत, बुद्धिकौशल्य, समयसूचकता, सामान्य ज्ञान, निर्णय घेण्याची क्षमता, संयम, इत्यादी निकषांचा आधारावर परीक्षण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ दंतचिकित्सक डॉ. नितीन जोशी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, समाजसेविका डॉ. विंदा भुस्कुटे, सनदी लेखापाल मंथन मेहता यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ट्रेवर मार्टीस उपस्थित होते. तसेच लायन राजुल पटेल, लायन जुड लोबो, लायन भद्रेश पटेल, टॅलेंट हंट स्पर्धेचे मार्गदर्शक, टाटा टेलेसेर्विसिसचे सल्लागार माधव जोशी, ओमकार एज्युकेशन ट्रस्टच्या दर्शना सामंत, फेडरल बँकेच्या डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट व रिजनल हेड माधुरी सजनेकर उपस्थित होते.

अंतिम फेरीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपदक, सन्मानपत्र, मोटिव्हेशनल पुस्तक आणि एज्युकेशनल किट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दोन्ही गटातील प्रथम आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सायकल देऊन, आणि द्वितीय ते पाचवा क्रमांक आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या विद्यमान अध्यक्षा लायन सपना सिंग यांनी केले, अनघा चक्रदेव, कौस्तुभ कुलकर्णी यांंनी सूत्रसंचालन केले. सचिव लायन रुपाली डोके यांनी आभार मानले. डोंबिवली टॅलेंट हंट २०२५ चे प्रकल्प प्रमुख लायन नित्यानंद पोवार यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. समन्वयक लायन अमोल पोतदार यांनी सर्व अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या युथ लीडरशिप अवेयरन्स कॅम्प ची माहिती दिली.

पारितोषिक विजेते गट ५ वी ते ७वी

प्रथम क्रमांक : मयूख नायर – पवार पब्लिक स्कूल, द्वितीय क्रमांक : आयुष दुघाडे – पवार पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक : अर्णव वैद्य ओंकार इंटरनॅशनल स्कूल, चौथा क्रमांक : दीक्षा प्रभुखोत – चं. पाटकर विद्यालय (सेमी), पाचवा क्रमांक : गौरी तेवारी – रॉयल इंटरनॅशनल स्कूल.

गट ८ वी ते १० वी

प्रथम क्रमांक : राजनील चौधरी – ओंकार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक : ओजस करंदीकर – ओंकार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक : यथार्थ शिंदे – गार्डियन हायस्कूल, चौथा क्रमांक : आभा लेले – सिस्टर निवेदिता हायस्कूल, पाचवा क्रमांक : आर्यन सेठ – पवार पब्लिक स्कूल.