डोंबिवली : डोंबिवलीतील एका सतरा वर्षाच्या तरूणीचा महाविद्यालय ते त्या तरूणीच्या घरापर्यंत मागील पाच महिन्यापासून पाठलाग करणाऱ्या एका तरूणाला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.
स्वामी राठोड (१९) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित तरूणी आणि आरोपी स्वामी राठोड हे परिचित होते. ते एकाच परिसरात राहत आहेत. तक्रारदार तरूणी डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. स्वामी राठोड अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून तिला आपल्याशी मैत्री करण्याची गळ घालत होता. तरूणी त्याला दाद देत नव्हती. याचा राग तरूणाला होता.
मागील पाच महिन्यांपासून पीडित तरूणी घरातून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली की स्वामी राठोड तिचा पाठलाग करत होता. तिला रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तरूणी त्याला झिडकारत होती. तरूणीने त्याला पाठलाग न करण्याचे आणि रस्त्यात कुठेही आडवे न येण्याची तंबी दिली होती. तरीही तरूणीने केलेल्या सूचनेकडे तो लक्ष देत नव्हता.
मागील पाच महिन्यांपासून दररोज स्वामी राठोड पीडित तरूणीचा पाठलाग करत होता. या सततच्या त्रासाने पीडित तरूणी त्रस्त होती. स्वामीचा दैनंदिन त्रास वाढू लागल्याने आणि नकळत त्याच्याकडून आपल्या जीविला धोका होण्याचा विचार करून पीडित तरूणीने मागील पाच महिन्यांपासून आपल्या बाबतीत स्वामी राठोड कडून होत असलेला प्रकार आई, वडिलांना सांगितला. हा प्रकार ऐकून आई, वडील चिंताग्रस्त झाले.
अलीकडे तरूणींच्याबाबतीत घडत असलेले प्रकार पाहून असे प्रकार आपल्या मुलीबाबत होता कामा नये हा विचार करून पीडितेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी आपल्या खास परचितांशी चर्चा केली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल तरूणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी पीडितेला कोणताही त्रास होण्यापूर्वीच ताब्यात घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे टिळकनगर पोलिसांनी सापळा लावून स्वामी राठोडवर टेहळणी ठेऊन त्याला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, असे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले.