कल्याण – शिळफाटा रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या रस्ता पृष्ठभाग समतलपणाची महत्वाची कामे शिल्लक असताना उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी या पुलाचे घाईने उद्घाटन करून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, या कामाचे ठेकेदार, या पुलाचे घाईघाईने उद्घाटन करणारे सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हेगारी कट, सदोष मनुष्यवधाचा तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे सोमवारी केली.

शिळफाटा रस्त्यावरील पलाव चौक भाग वाहतूक कोंडी मुक्त होण्यासाठी काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी लवकर खुला होणे गरजेचे होते. परंतु, हा पूल सुरू करण्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी सुयोग्य झाला आहे का याची पाहणी एमएसआरडीसीच्या नियंत्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती का. कंत्राटदाराने पूल वाहतुकीसाठी खुला करण्या योग्य झाला आहे, असे पत्र एमएसआरडीसीला दिले होते का. एमएसआरडीसी अधिकारी आणि ठेकेदार यांनी पूल वाहतुकीसाठी सुयोग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे आणि पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने या पुलाचे उद्गाटन केले आहे का, असे प्रश्न जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत.

आमदार मोरे आणि समर्थकांनी पुलाचे घाईने उद्घाटन केल्यानंंतर काही क्षणात या पुलावरून दुचाकी स्वारांच्या दुचाकी घसरून पडल्या. काही जण जखमी झाले. या पुलाचे स्थापत्य काम पूर्ण झाले असले तरी या पुलावर रस्ते पृष्ठभागावर गुळगुळीतपणा येण्यासाठी मास्टेक अस्फाल्टचा थर टाकण्याची कार्यवाही ठेकेदाराने सुरू केली होती. हे नियोजन सुरू असताना सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रेयवादासाठी घाईने या पुलाचे उद्घाटन केले.

या उद्घाटनानंतर ठेकेदाराला याठिकाणी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी द्रव्याचा चिकट रासायनिक डांबरासारखा फवारा मारावा लागला. यामुळे वाहने अधिकच घसरू लागली म्हणून त्यावर घाईने दगडाची पावडर (ग्रीट) टाकण्यात आले. ग्रीट आणि फवारा आणि त्यात पाऊस त्यामुळे पुलावर चिखल तयार झाला होता, असे तक्रारदार म्हात्रे यांनी सांगितले.

घाईच्या उद्घाटनामुळे पुलाची दशा झाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे पुलाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूल घाईने सुरू करून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारे एमएसआरडीसी अधिकारी, ठेकेदार, उद्घाटन करणारे सत्ताधारी आमदार, पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मागच्या तारखेने पूल सुस्थितीत आहे असे पत्र ठेकेदाराने एमएसआरडीसीला दिले असेल आणि त्याला प्रशासनाने संमती दिली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर खोट्या प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र गुन्हा नोंद करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिजेटीआयमधील बांधकाम तज्ज्ञ, राज्याच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागाने काटई निळजे पुलाची तपासणी करावी अशी मागणीही आम्ही शासनाकडे करणार आहोत. यामधील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.-दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट, डोंबिवली.