डोंबिवली – गणेशोत्सवाच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंंबिवलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. या गणपती दर्शन भेटीपासून दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या. आणि आता तर या वावड्या मातोश्रीपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर अचानक गडबड नको म्हणून ठाकरे गटाने डोंबिवलीत नव्या जिल्हाध्यक्षाचा शोध सुरू केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी अद्यापर्यंत याविषयी उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या पक्षांतराच्या विषयाला नाहक फाटे फुटू नयेत. अनावश्यक हा विषय चर्चेला येऊ नये म्हणून जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी यावेळी फडके रोडवरील दिवाळीच्या पहिल्या दिवशी येणे टाळले. दीपेश म्हात्रे असे काही करणार नाहीत, असे त्यांचे समर्थक सांगतात.
डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचा एकमेव लढवय्या पदाधिकारी म्हणून दीपेश म्हात्रे यांना ओळखले जाते. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत म्हात्रे यांनी नागरी समस्या, विकास कामे, ६५ बेकायदा इमारती विषयावर आवाज उठवून मोर्चे काढले. लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. दीपेश म्हात्रे यांच्यासारखा लढवय्या, एक हाती मोर्चा, आंदोलने करणारा पदाधिकारी ठाकरे गटातून बाहेर पडू नये यादृष्टीने काही नेते प्रयत्नशील असल्याचे समजते.
आगामी राजकीय भविष्याचा विचार करून, भिवंडीचे माजी खासदार भाजपचे कपील पाटील यांच्या बरोबर असलेले कौटुंबिक नातेसंबंध आणि या माध्यमातूनही घालण्यात आलेली गळ याचा विचार करून दीपेश म्हात्रे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर त्यांचे पॅचअप झाल्याची चर्चा आहे. याविषयी ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी याविषयी आम्हाला याविषयी काही माहिती नसल्याचे सांगतात. जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांना संपर्क साधला. त्यांनीही याविषयी बोलण्यास नकार देऊन अधिकचे बोलणे टाळले.
ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी शहरात ठाकरे गटाचे जिल्हा संघटक तात्या माने, जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, कल्याण ग्रामीण प्रमुख राहुल भगत आणि इतर काही पदाधिकाऱ्यांची यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या सोबत काही पदाधिकारी, कार्यकर्ते गेले तर पुन्हा काय करायचे असाही विचार ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. निष्ठावान ठाकरे गटातील पदाधिकारी वगळता उर्वरित दीपेश म्हात्रे यांच्या सोबत जाण्याची चर्चा आहे.
अधिक माहितीसाठी ठाकरे गटाच्या डोंबिवलीतील काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी याविषयी आम्हीच संभ्रमात आहोत. जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांनीही आम्हाला अद्याप काही सांगितलेले नाही. त्यामुळे आम्ही याविषयी काही बोलू शकत नाही. फक्त भाजपमध्ये जाणार हे आम्ही गणेशोत्सवापासून ऐकत आहोत. आता तर ते या आठवड्यात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, असे कार्यकर्ते सांगतात. ठाकरे गटाचे समन्वयक गुरूनाथ खोत यांना संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मी अद्याप ठाकरे गट जिल्हाध्यक्षपदी आहे. आगामी पालिका निवडणुकीचा विचार करून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेत आहे. माझा कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. काही लोक मी इतर पक्षात जाणार म्हणून अफवा पसरवत आहे. वेळ येईल तेव्हा बघू आणि त्यावेळी योग्य निर्णय घेईन. -दीपेश म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, ठाकरे गट, डोंबिवली.
