डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर जवळील राहुलनगर भागात शनिवारी दुपारी एका २२ वर्षाच्या तरूणाने इमारतीच्या अकराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही आत्महत्या या तरूणाने प्रेयसी बरोबरच्या वादातून केली असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे या तरूणाच्या तापट स्वभावामुळे त्याने रागाच्या भरात ही आत्महत्या केली आहे.
ऋषिकेश चारूदत्त परब (२२) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह राहुलनगर मधील सुदामा रेसिडेन्सी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर राहत होता. शनिवारी दुपारी ऋषिकेश परब काही कारणावरून झालेल्या वादातून रागाने इमारतीच्या अकराव्या माळ्यावरील डक्ट (इनर बाॅक्स) मध्ये जाऊन बसला. तो बराच उशीर डक्टच्या कट्ट्यावर आधार घेऊन होता. तो जीवाचे बरेवाईट करण्याची शक्यता असल्याने ही माहिती कुटुंंबीयांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभाग, विष्णुनगर पोलिसांना दिली.
पोलिसांनी सामंजस्याचे उपाय करून ऋषिकेश परबला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. त्याला इमारतीच्या डक्टवरून काहीही न करता खाली येण्याचे आवाहन पोलीस करत होते. त्याची समजूत काढण्याचे सर्व प्रकारचे कुटुंबीय, पोलिसांचे प्रयत्न थकले होते.
त्याच्या दिशेने जाऊन त्याला पकडून खाली उतरण्याचा प्रयत्न केला तर तो झटपट वरून उडी मारण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन जवान, पोलीस सामंजस्याने, त्याचे मन परिवर्तन करून त्याला खाली उतरविण्यासाठी प्रयत्नशील होते. आपल्या बचावासाठी खाली सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे लक्षात आल्यावर ऋषिकेश परब डक्टवरून इमारतीच्या बाहेरील भागात आला. तो तेथील कठड्याला धरून इमारतीला लोंबकळू लागला. हा सगळा प्रकार पाहून उपस्थित हादरले.
पोलीस, जवानांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तो कोणालाच जुमानत नव्हता. इमारतीच्या कठड्याला लोंबकळत असताना त्याने दोन्ही हात सोडून जमिनीच्या दिशेने उडी मारली. त्याला तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाली. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रेयसी बरोबरच्या मोबाईलवर झालेल्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता परिसरातील नागरिक, पोलिसांकडून व्यक्त केली जात होती. आता मयत ऋषिकेशचा भाऊ संतोष परब यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत ऋषिकेश तापट स्वभावाचा होता. त्यामधून त्याने हे कृत्य केले असल्याचे म्हटले आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की २०१८ मध्ये ऋषिकेश हा इयत्ता अकरावी मध्ये डोंबिवलीतील साऊथ इंडियन महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो अकरावीमध्ये नापास झाला. त्यामुळे रागाच्या भरात ऋषिकेश डोंबिवली सोडून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावी निघून गेला होता. दोन वर्षापूर्वी ऋषिकेशने रागाच्या भरात फिनेल प्याले होते. तात्काळ उपचार केल्याने तो बचावला होता. तो अतिशय तापट स्वभावाचा होता. या तापट स्वभावाच्या ओघात त्याने हे कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.